ठाणा : आमगाव तालुक्याच्या ठाणा व बोथली येथे कोरानाचा उद्रेक झाला आहे. तपासणीसाठी पुढे न येता घरातच दडून राहणाऱ्यांना प्राणास मुकावे लागणार आहे. यासाठी खबरदारी म्हणून आमगाव तालुका प्रशासनाने आज (दि.१५) रोजी बोथली व ठाणा गाठून या दोन्ही गावातील संशयीत लोकांची तपासणी केली. या तपासणीत बोथली येथे कोविडचे ३१ रूग्ण तर ठाणा येथे २१ रूग्ण आढळले आहेत.
आमगाव तालुक्याच्या बोथली येथे आठ दिवसात चार जणांचा मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू कशाने हे गुपीतच आहे. त्यांची चाचणीच झाली नसल्याने नेमका मृत्यू कशाने हे कळू शकले नाही. परंतु त्यांचा कोविडने मृत्यू झाल्याची वार्ता आमगाव तालुक्यात पसरली. परिणामी आमगाव येथील व्यापारी सुध्दा बोथली वासीयांना सामानही देण्यास घाबरले. बोथलीत कोविड रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही कुणीही चाचणीसाठी पुढे येत नव्हता. परिणामी या गावातील चार लोकांचा मृत्यू झाला. परंतु त्यांची कसलीच चाचणी न झाल्याने त्या मृत्यू कोरोनाच्या म्हणून ग्राह्य धरण्यात आले नाही. बोथली येथील ज्या लोकांना कोविडची लक्षणे होती अश्या १५० लोकांची चाचाणी केल्यावर ३१ लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. ठाणा येथे २१ कोरोना रूग्ण आढळले आहेत. या दोन गावात कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे हे दोन गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करून या गावांना सील करण्यात आले आहे. बोथली येथे तहसीलदार डी. एस.भोयर, खंडविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, ठाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेम बघेले व त्यांच्या चमूने भेट देऊन पाहणी केली.
बॉक्स
चार मृत्यूत गर्भवतीचा समावेश
बोथली येथे एकाच आठवड्यात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात एक गर्भवती महिला होती. परंतु या चारही लोकांची आरटीपीसीआर किंवा रॅपिड अशी कसलीच तपासणी झाली नव्हती. आठ-दहा दिवसापासून त्यांना ताप होता. त्यांनी खासगी डॉक्टरांची औषधी घेतली परंतु आराम झाला नाही. परिणामी त्यांना प्राणास मुकावे लागले. परंतु त्यांचा मृत्यू कशाने झााल हे आताही गुपीतच आहे.
बॉक्स
गोरठ्यात कोविडने एक मृत्यू
आमगाव तालुक्याच्या गोरठा येथे एका ८१ वर्षाच्या वृध्देचा कोरोनाने मृत्यू झाला. गोरठा, ठाणा, बोथली या तीन गावात कोरोनाचा संसर्ग पसरला असून याकडे नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.
कोट
कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास तपासणीसाठी पुढे यावे, जेणेकरून वेळेच्या आत उपचार झाल्यास जीव वाचेल. लक्षणे दिसल्यास घरात राहू नका अन्यथा मोठा भूर्दंड बसेल.
- चंद्रकांत साबळे, खंडविकास अधिकारी, आमगाव.