शिवशाही अपघाताला चालकच जबाबदार ! अपघातात ११ जणांचे गेले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:36 PM2024-12-11T17:36:57+5:302024-12-11T17:37:37+5:30

चौकशी पूर्ण : अहवाल परिवहन आयुक्तांकडे

The driver is responsible for Shivshahi accident! 11 people lost their lives in the accident | शिवशाही अपघाताला चालकच जबाबदार ! अपघातात ११ जणांचे गेले प्राण

The driver is responsible for Shivshahi accident! 11 people lost their lives in the accident

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वा जवळ शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन ११ जण ठार झाले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या चौकशी समितीने दहा दिवस सखोल चौकशी करून आपला अंतिम चौकशी अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात अपघातास चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


खजरी डव्वा जवळ शिवशाही बसच्या भीषण अपघातानंतर महामंडळावर चौफेर टीका झाली. तसेच शिवशाही बसेसच्या फिटनेसवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. तर प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने सुद्धा या अपघाताची गांभीर्याने दखल घेतली. शिवशाही बसच्या अपघातातील नेमकी कारणे काय आहेत, अपघातास नेमके कारणीभूत कोण, शिवशाही बसचे फिटनेस आदी सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी दोन चौकशी समिती गठित केल्या होत्या. जिल्हास्तरावर गोंदियाचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम तिवसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. तर विभागीय स्तरावर नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती होती. 


गोंदिया येथील समितीने दोन दिवसांपूर्वीच आपला अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे सादर केला. यानंतर चव्हाण यांनी दोन्ही चौकशी अहवाल एकत्रित करून त्याचा एकत्रित अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. 


या चौकशी अहवालात खजरी शिवशाही अपघातास चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच अपघातग्रस्त शिवशाही चालकाकडून यापूर्वी सुद्धा अपघात झाले असताना त्याला सेवेत कार्यरत कसे ठेवण्यात आले यावर सुद्धअ ताशेरे ओढण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशी अहवालावरून चालकासह एसटी महामंडळाचे काही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित मानली जात आहे. 


मुंबई येथील संस्था चौकशीसाठी दाखल 
शिवशाही बस अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी व अपघा- तातील कुठली बाजू सुटू नये यासाठी थर्ड पार्टी चौकशी केली जात आहे. यासाठी मुंबई येथील एका स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती सोमवारी नागपूर येथे दाखल झाली. या समितीने खजरी येथील घटनास्थळाला भेट देऊन अपघातामागील कारणे जाणून घेतल्याची माहिती आहे. ही समिती देखील परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे.


परिवहन आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष 
खजरी शिवशाही बस अपघात प्रकरणाचा चौकशी अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर केल्यानंतर आता याप्रकरणी ते याप्रकरणी नेमकी कुणा- कुणावर कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: The driver is responsible for Shivshahi accident! 11 people lost their lives in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.