गोंदिया : लोकसभा निवडणुकीला घेऊन अलर्टमोडवर असलेल्या रावणवाडी पोलिसांनी गुरूवारी (दि.२१) रावणवाडी शिवारातील गोंदिया-बालाघाट मार्गावर असलेल्या आरटीओ बॅरेल येथे मोटारसायकल अडवून एका दुचाकीवरील तीन मुलांना पकडले. त्यांच्या जवळून एक देसी कट्टा जप्त करण्यात आला.
गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करणे व गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सर्व ठाणेदारांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने रावणवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे, हवालदार संजय चौहाण गुरूवारी (दि.२१) रात्रीच्या वेळी रावणवाडी हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही मुले देसी कट्टा विक्रीच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोंदिया-बालाघाट मार्गावरील आरटीओ बॅरेल जवळ सापला लावला. दरम्यान, मोटारसायकल क्रमांक एमपी ५०-एमटी ७१९८ वर ट्रिपल सीट बसून बालाघाटहून गोंदियाकडे येत असलेल्या तिघांना थांबविले. यामध्ये आरोपी विशाल मुलायचंदसिंह लिल्हारे (२३, रा. बगदरा, बालाघाट-मध्यप्रदेश ) व त्याच्या सोबत असलेल्या दोन विधीसंधर्षीत बालकांची झडती घेतली असता ५० हजार रूपये किंमतीचा एक देसी कट्टा मिळून आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शत रावणवाडीचे निरीक्षक अहेरकर, सपोनि. अंबुरे, हवालदार संजय चौहाण यांनी केली आहे.मोटारसायकल व कट्टा केली जप्त- पोलिसांनी तिघा मुलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे देसी कट्टा आढळून आला. यावर पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा देसी कट्टा व ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल क्रमांक एमपी ५०-एमटी ७१९८ तसेच १३ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकुण ९८ हजार रूपयांचा माल जप्त केला. रावणवाडी पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि. अंबुरे करीत आहेत.