लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २-३ दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधितांची वाढ होत असल्याने ऐन नवरात्रीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रविवारी (दि.१०) जिल्ह्यात एकाही बाधिताची नोंद नसल्याने तेवढाच दिलासा मिळाला असून सातत्याने होत असलेल्या रुग्णवाढीला खंड पडला. आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण असून जिल्हावासीयांनी खबरदारी घेतल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. गर्दी वाढल्यास कोरोनाला फोफावण्यासाठी वातावरण मिळते व तेथूनच घात होतो असे आता सुमारे २ वर्षांतील अभ्यासातून दिसून आले आहे. त्यात आता नवरात्री सुरू असून जिल्हाभरातच गर्दी वाढत चालली आहे. शिवाय दिवाळी तोंडावर असल्याने नागरिक आता बाजाराची धाव घेताना दिसत आहेत. हेच कारण आहे की वाढती गर्दी बघता कोरोनाचा धोकाही वाढत आहे. यातूनच मागील २-३ दिवसांपासून सातत्याने दररोज एका बाधिताची नोंद जिल्ह्यात घेतली जात होती व ही आकडेवारी ४ वर आली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा पाय पसरताना दिसत होता. मात्र, रविवारी (दि.१०) जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद नसून सातत्याने वाढत असलेल्या रुग्णवाढीला खंड पडल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे. या ४ ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये २ रूग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रूग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. रविवारी रूग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आता कुणालाही परवडणारी ठरणार नाही. याकरिता तोंडावर मास्क व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात ४५७५७४ तपासण्या- जिल्ह्यात आतापर्यंत ४५७५७४ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २३६०४० आरटी-पीसीआर तपासण्या असून २२१५३४ रॅपिड अँटिजन आहेत. यानंतर ४१२२५ कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.० टक्के आहे. यावरून जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.लसीकरण हाच रामबाण उपाय - कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने कहर केला असून कित्येकांना त्यांच्या आप्तांपासून हिसकावून नेले आहे. यामुळे कोरोनाची भीती ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांनाच जास्त चांगली समजून आली आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक लोक निष्काळजीपणे वागताना दिसत असून लस घेणे टाळत आहेत. मात्र, कोरोनापासून तुमचा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी फक्त लस हाच एकमेव रामबाण उपाय असून लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.