गोंदिया : मध्य प्रदेश राज्यातील मंडला-मानिकपुरा येथील १६ वर्षीय मुलीला व तिच्या प्रियकराला काम मिळवून देण्याच्या नावावर येथील रेल्वे स्थानकावर आणून मुलीला मध्य प्रदेशच्या घोटी येथे नेणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली होती. त्या तिघांना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी नंतर आता भंडारा येथील तुरुंगात रवाना करण्यात आले आहे.
मंडला-कायखेडा येथील प्रकाश ग्यानी यादव (२१) याने मानिकपुरा मंडला येथील एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे आणले. पळून आल्यावर पोट भरण्यासाठी प्रकाशला कामाची गरज असल्याने कोमलप्रसाद बागळे (३४, रा. किन्ही, मध्य प्रदेश) याने त्या दोघांना गोंदिया येथे चला तुम्हाला काम मिळवून देतो असे बोलून येथे आणले. त्या मुलीला येथील मध्य प्रदेश राज्यातील घोटी येथील छन्नूलाल नागपुरे (४२) याच्या घरी संजयनगरातील संगीता गोपाल यादव (३०) हिने नेले होते.
प्रकरणी आरोपींवर भादंविच्या कलम ३६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना शहर पोलिसांनी १६ जुलै रोजी अटक केली होती. मुलीला राजस्थान किंवा हरियाणा येथे विक्री करण्याचा त्यांचा डाव होता. परंतु शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो डाव हाणून पाडला. जिल्हा सत्र न्यायालयाने त्या आरोपींना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र त्यानंतर आता तिघांची तुरुंगात रवानगी केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, सायबर सेलचे दीक्षितकुमार दमाहे, प्रकाश गायधने, चौधरी, योगेश बिसेन, ओमप्रकाश मेश्राम यांनी केली आहे.