गोंदिया : वाढत्या कोरोना संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी कोरोना लसीकरण प्रभावी उपाय समजले जात होते. यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. लसीकरण मोहिमेला गती आली असतानाच आता जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने संपूर्ण १४० केंद्रांवरील लसीकरण मोहीम बुधवारपासून पूृर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी लसीकरणासाठी तीन लाख १५ हजार नागरिक वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी एकूण १४० केंद्रांवरून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख ८ हजार २४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यासाठी जवळपास ५८ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले. यात १४१६४ आरोग्य कर्मचारी, २०६२२ फ्रंटलाईन वर्कर, ४५३८१ ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील २९२४१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यात एकूण ९५३७१ नागरिकांना पहिला डोस, तर १३२५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील जवळपास ३ लाख १५ हजार नागरिकांना कोरोना लसीकरण होणे बाकी आहे. यासाठी जवळपास ३ लाख १८ हजार लसींची गरज आहे. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण लसींचा साठा संपल्याने बुधवारपासून लसीकरण माेहीम पूर्णपणे ठप्प करण्याची वेळ आली. जिल्हा आरोग्य विभागाने ३ हजार डोस शिल्लक होते तेव्हाच शासनाकडे २ लाख ७८ डोसची मागणी केली होती. मात्र पुणे येथून लसींचा पुरवठा झाला नसल्याने जिल्ह्याला लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आता जवळपास पाच दिवस लसीकरण ठप्प ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली.
...........
प्रतिसाद वाढत असतानाच ब्रेक
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर जनजागृती सुरू करण्यात आली होती. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येऊ लागले होते. परिणामी दरराेज दहा हजारांवर नागरिकांना लसीकरण केले जात होते. मात्र अशातच लसींचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.
...........
केंद्रावरून परतले अनेक जण
लसीकरणाला गती मिळावी यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व १० खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकसुध्दा मोठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद देत होते. पण अनेकांना लसींचा साठा संपल्याची माहिती नसल्याने केंद्रावरून लस न घेताच परतावे लागले.
................
शनिवारपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता
आरोग्य विभागाने शासनाकडे २ लाख ७८ हजार लसींची मागणी केली आहे. पुणे येथून लस आणण्यासाठी शुक्रवारी गाडी जाणार असून शनिवारी ती परतणार आहे. यानंतर शनिवारीच गोंदिया जिल्ह्याला लस मिळण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
.......
आरोग्य विभागाने शासनाकडे लसींची मागणी केली आहे. शनिवारपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा युध्दपातळीवर लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.
- डॉ. संजय पांचाळ, लसीकरण अधिकारी