- नरेश रहिले गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय पोषाहार पुनर्वसन केंद्र सुरू झाले. या केंद्रात मागील तीन महिन्यांत दाखल केलेल्या ९४ बालकांपैकी ८४ बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर पडले आहेत.जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अंगणवाडी, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातून कुपोषणग्रस्त बालकांना १४ दिवसांसाठी या पोषाहार पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाते. गावपातळीवर व्हीसीडीसी व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर महिनाभर सीटीसी या विशेष शिबिरातून ही वजन न वाढणारी बालके येथे दाखल केली जातात. केंद्रात बालरोग व आहारतज्ज्ञ, तसेच समुपदेशिका यांच्या संयुक्त पथकाने तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केले.बालकांस सारिका तोमर व स्वाती बंसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेळा पोषण आहार देण्यात आला. बालरोगतज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी बालकांना अत्यावश्यक मायक्रो सप्लिमेंट्स व व्हिटामिन ए व डी चे डोसेज देण्याचा सल्ला दिला. त्यातून ८४ बालकांना नवसंजीवनी मिळाली.मागील पंधरवड्यात तुमखेडा येथून आलेल्या ८ महिन्यांच्या बाळाचे वजन फक्त दीड किलो होते. पोषाहार पुनर्वसन केंद्रातून प्रभारी अधीक्षिका डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या मार्गदर्शनात पोषाहार उपचाराला प्रतिसाद दिल्याने कुपोषणग्रस्त बालकाचे वजन १४ दिवसांत चक्क ३.७५० किलोग्राम झाले.>१० बालके दुर्धर आजारांनी ग्रस्ततीन महिन्यांत दाखल ९४ बालकांपैकी १० बालकांची स्थिती सुधारलेली नाही. त्यांना दुर्धर आजार व व्यंग आहे. गर्भवतींची योग्य काळजी न घेतल्याने बाळांची वाढ झालेली नाही.
तीन महिन्यांत ८४ बालके कुपोषणमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:36 AM