आश्रमशाळातील मुलांना देणार : हिवतापावर आळा घालण्याचा खटाटोप गोंदिया : जिल्हा हिवताप विभाग मागील १० वर्षांपासून मच्छरदाण्यांची मागणी करीत आहेत. परंतु शासन मच्छरदाणी पुरवत नव्हते. १५ दिवसापूर्वी जिल्ह्याच्या हिवताप कार्यालयाला तीन हजार मच्छरदाण्या मिळाल्या आहेत. हिवतापाचा प्रकोप वाढू नये यासाठी शासन स्तरावर उपाययोजना म्हणून सदर मच्छरदाण्या पाठविण्यात आल्या आहेत. यापूर्वी २००५ मध्ये जिल्हा हिवताप विभागामार्फत मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी १० रुपये किमतीला या मच्छरदाण्या खुल्या बाजारात विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. नेहमी मच्छरदाण्यासंदर्भात तक्रारी शासनाकडे जात असल्यामुळे शासनाने मच्छरदाण्यांचा पुरवठा करण्यास मधल्या काळात उत्सुकता दाखविली नाही. हिवताप विभाग मागील १० वर्षापासून सतत मच्छरदाण्याची मागणी करीत होते. जिल्हा हिवताप कार्यालयाला प्राप्त झालेल्या तीन हजार मच्छरदाण्यास आश्रम शाळाची संख्या पाहून त्यांना वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय प्राथमिक आश्रम शाळांना मच्छरदाणी वाटपात प्राधान्य द्यावे लागणार आहे. अन्यथा आश्रम शाळांनाही या मच्छरदाण्या कमी पडणार आहे. ज्या ठिकाणी मच्छरदाणी वाटप करण्यात येते, त्या ठिकाणी फवारणीचे काम केले जात नाही. परंतु मच्छरदाणीपेक्षा फवारणी करण्याची मागणी अधिक असते. (तालुका प्रतिनिधी)४८७ गावात होणार फवारणी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून १ ते ३० जूनदरम्यान जनजागृती अभियान चालविण्यात येत आहे. जून महिना हिवताप विरोधी महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, गावात प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. ग्रामसभेचे आयोजन करून नागरिकांना हिवतापासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. एवढेच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येईल. नागरिकांना गप्पी मासे दाखविण्यात येणार आहे. डासांनी चावा घेतल्यास आजार कसा होतो याची माहिती दिली जाणार आहे. ही जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. १३ जूनपासून जिल्ह्यातील ४८७ गावांत फवारणी करण्यात येणार आहे.
१० वर्षांनंतर मिळाल्या तीन हजार मच्छरदाण्या
By admin | Published: June 05, 2016 1:34 AM