बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:36 AM2021-09-16T04:36:44+5:302021-09-16T04:36:44+5:30
गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय ...
गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्यात आले. परिणामी बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून तीन फूट पाणी बुधवारी (दि. १५) वाहत होते. बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
मध्य प्रदेशातील संजय सरोवर ८५ टक्के भरले आहे. या धरणाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पुढील २४ तासांत या धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्यात येण्याची शक्यता आहे. या धरणातून पाणी सोडल्यास बाघ नदीच्या पाणीपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून बुधवारी तीन फूट पाणी वाहत होते. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने देवरी, सालेकसा, आमगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांतील नदी काठालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे १ फुटाने, तर कालीसरार धरणाचे तीन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आला आहे. बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सालेकसा आणि आमगाव तालुक्यांतील तीन-चार नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद होते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली असून, बळिराजा सुखावला आहे.
...................
जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस
गोंदिया : ३३.९ मिमी
आमगाव : २७.७ मिमी
तिरोडा : ८.५ मिमी
गोरेगाव : २२.५ मिमी
सालेकसा : २४.३
देवरी : ४३.३ मिमी
अर्जुनी मोरगाव : २४.९ मिमी
सडक अर्जुनी : १९.४
...................................
एकूण : २६.२ मिमी
........................
सरासरीच्या तुलनेत ८७ टक्के पाऊस
जिल्ह्यात १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत ११२१ मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत या कालावधीत १०६८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ९५.३ टक्के आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२२० मिमी पाऊस पडतो त्या तुलनेत ८७.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
..............