नवेगावबांध : राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या वनमंत्रालयाने मान्य केलेल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील समस्त वनरक्षक व वनपाल २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहेत. संघटनेच्या वतीने तशी नोटीसही शासनाला देण्यात आलेली आहे.वनरक्षकाला २४०० रुपये तर वनपालाला ३५०० रुपये ग्रेडपे देण्यात यावा, वनरक्षकास तलाठी पदाप्रमाणे व वनपाल पदास मंडळ अधिकारी पदाप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, एका वनरक्षकाकडे सरासरी ६९ चौ.कि.मी. क्षेत्र तर एका वनपालाकडे २५५ चौ.कि.मी. क्षेत्र फिरतीला आहे. यासाठी निश्चित प्रवास भत्ता देण्यात यावा, नियमानुसार राज्यसीमा तपासणी नाक्यावर शासकीय रक्कम वसुल करने व वाहतूक पास देण्यासाठी वनपालाची आवश्यकता असून वनपालांची नियुक्ती करण्यात यावी, पोलीस दलात कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सवलती वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील लागू कराव्या, आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ एस.एस.सी. नापास वनरक्षक व वनपालांना मिळावा, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा २८ मार्च २०१३ चे पत्रानुसार नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी, वनपाल व वनरक्षकास कामाचे आठ तास निश्चीत करावे. वरीलपैकी बहुतेक मागण्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना वनविभागाने मान्य करण्याचे कबूल केले. परंतु शासनाने अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही. आता २७ आॅगस्ट २०१४ रोजी मंत्रीमंडळाची बैठक असल्याकारणाने संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची नोटीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. शासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे वनरक्षक व वनपालांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
वनरक्षक व वनपालांचा आजपासून बेमुदत संप
By admin | Published: August 24, 2014 11:34 PM