डायट गोंदिया येथील प्राचार्यांचा तुघलकी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:01 AM2021-09-02T05:01:51+5:302021-09-02T05:01:51+5:30
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतर्गत डायटची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या ...
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतर्गत डायटची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या गुणवत्तेची शिखर संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते; पण सध्याची गोंदिया येथील डायट प्राचार्यांची परिस्थिती पाहता अनागोंदी कारभार चालल्याचे दिसत आहे.
गोंदिया येथील प्राचार्य राजेश रुद्रकार यांचे प्रशासन म्हणजे तुघलकी प्रशासन की काय? असे चित्र सध्या डायटमध्ये आहे. जिल्ह्याच्या गुणवत्तेची जबाबदारी ही डायट या संस्थेकडे असते. या संस्थेला जिल्ह्याची शिखर संस्था म्हणून पाहिले जाते. डायटकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. येथे प्रतिनियुक्तीवर जिल्ह्यातून आठ-दहा शिक्षकांची विषय सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एवढे मनुष्यबळ असूनसुद्धा जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी भरीव असे काम होताना डायटमार्फत मागील दोन वर्षांपासून दिसत नाही. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्यात जिल्हा गुणवत्ता कक्षाची सभा घेणे अपेक्षित असते; परंतु जुलै २०२० ते जून २०२१ या काळात एकदाही सभा घेण्यात आली नाही. यावरून प्राचार्यांचे जिल्ह्याच्या शिक्षणाशी काहीही देणे घेणे नाही, असे स्पष्ट दिसत आहे. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षण पोहोचविण्यासाठी वेगवेगळे शासन स्तरावर उपाय करण्यात आले; पण डायट गोंदियाने काहीच काम केले नसल्याचा आरोप आहे. प्राचार्य यांनी जून २०२१ मध्ये काही जावक क्रमांक हे परस्पर रिकामे ठेवले आहेत. त्या पूर्वीचे जावक क्रमांक लिहिण्यात आले. नंतरचे जावक क्रमांकपण पूर्ण करण्यात आले; परंतु मधातील जावक क्रमांक रिकामे ठेवले आहेत. प्राचार्यांना आता काय साध्य करायचे आहे? की काही बोगस निविदा किंवा बिले लावायची आहेत की काय? हे न सुटणारे कोडे आहे. डायट प्राचार्य शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आहे. डायट गोंदियाची निर्मिती झाली तेव्हापासून रूद्रकार नऊ महिने वगळता ११ वर्षांपासून गोंदियातच आहेत. यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकंदर परिस्थिती पाहता डायट प्राचार्य राजेश रुद्रकार जिल्ह्याचा गुणवत्तेसाठी कोणताही ठोस उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण काही करण्याचे नियोजन दिसत नाही. म्हणजेच डायट कार्यालय गुणवत्तेसाठी सध्या काहीच काम करीत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.