गोंदिया : शहराच्या मुख्य बाजार परिसरात असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवर तयार होत असलेल्या पार्किंग प्लाझासाठी राज्य शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्य योजनेंतर्गत सदर निधी मंजूर केला असून निधी नगर परिषदेला वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाजार परिसरात पार्कींगची व्यवस्था नसल्याने ट्राफिक जामची समस्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर कायमचा तोडगा निघावा या दृष्टीने आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शहर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलीस क्वॉर्टर्सच्या १६ हजार स्क्वे.फुट लागेवर पार्कींग प्लाझा तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र सदर जागा नगर विकास आराखड्यात पोलीस निवास म्हणून दर्शविण्यात आली होती. त्यामुळे पार्कींग प्लाझा तयार करण्यात तांत्रिक अडचण येत होती. यावर मात्र नगरविकास विभागाकडून विशेष अधिसूचना पारित करून पोलीस निवासाचे आरक्षण पार्कींग व बहुउद्देशीय सभागृहासाठी बदलविण्यात आले. यानंतर पार्कींग प्लाझाच्या बांधकामासाठी निधीची अडचण आली असता राज्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी वैशिष्टपूर्ण कार्य योजनेंतर्गत दोन कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी नगर परिषदेला वितरीत करण्यात आला आहे. पार्कींग प्लाझा तयार करण्यासाठी आरक्षित जागेवर असलेले जुने पोलीस क्वॉर्टर्स तोडून जागा सपाट करण्यात आली आहे. आता या जागेवर तीन हजार दुचाकी ठेवता येतील एवढा भव्य पार्कींग झोन तयार केला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
पार्किंग प्लाझासाठी दोन कोटी
By admin | Published: September 14, 2014 12:02 AM