गोंदिया : गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्गावर पाईप व केबल टाकण्याचे काम करीत असताना माती खचल्याने त्याखाली दबून दोन मजूर ठार तर एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजता सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर घडली.
राजेश देवलाल शरणागत (३५) आणि अंकर पंधरवार (३५) ,रा.शिवनी, रावणवाडी असे मृत मजुरांची तर चंद्रविलास शहारे (२५) रा.लहीटोला, असे जखमी मजुराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ पासून काही अंतरावर रूळाखाली पाईप व केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावर चार मजूर कार्यरत होते. मात्र हे काम करीत असताना शेजारच्या रूळावरून गाडी गेल्याने जमिनीत कंपन झाले आणि रूळाखाली पॉर्इंट टाकण्यासाठी जागा बनविण्यासाठी असलेले मजूर त्या माती व गिट्टीखाली दबले. यात राजेश शरणागत व अंकर पंधरवार जागीच ठार झाले. तर चंद्रविलास शहारे हा गंभीर जखमी झाला. त्यांच्या सोबत काम करीत असलेल्या चौथा मजूर सुदैवाने बचावला. त्यानेच याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान या घटनेमुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काहीकाळ गोंधळ उडाला होता. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी मजुराला रुग्णालयात दाखल केले. या कामाचे कंत्राट रेल्वेने भगवती कंस्ट्रक्शन कंपनीला दिले असून घनश्याम प्रमर यांची ही कंपनी असल्याचे सांगितले जाते. रेल्वे पोलिसांनी प्रकरण नोंद केले असून कंत्राटदाराला ठाण्यात बोलाविले होते. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.