आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या दोन बहिणी झाल्या पोलिस, समाजासमोर ठेवला आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:03 PM2023-06-06T12:03:30+5:302023-06-06T12:04:13+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर केली मात : भावाने केला सांभाळ
गोंदिया : लहानपणीच आई-वडिलांचे डोक्यावरील छत्र हिरावले, त्यातच अठराविश्व द्रारिद्र्य, आधार देणारा मोठा वडीलधारा कुणीच नाही, नातेवाईकही मदतीसाठी समोर येईना, अशा परिस्थितीत गोंदिया तालुक्यातील काटी येथील दोन बहिणींनी परिस्थितीची जाणीव ठेवत भरपूर अभ्यास करून यश संपादन केले. या दोन्ही बहिणींची नुकतीच पोलिस दलात निवड झाली आहे.
रंजिता गिरी, कांचन गिरी असे त्या दोन बहिणींचे नाव आहे. वडील काय हे कळण्याअगोदरच लहानपणी वडील मरण पावले तर काका आणि काकू यांचेही निधन झाले. तर सख्ख्या आईचा खून शेजारच्या व्यक्तीने या लहान मुलांच्या समोर केला. जिवाच्या आकांताने ही मुले ओरडत होती. एकुलता एक दोन घराचा आधार भरण पोषण करणारा हा दुवा कायमचा शांत होता.
तेरा वर्षांपूर्वीचा हा प्रसंग त्यावेळी या गिरी परिवाराचा संकेत शाळेतही गेला नव्हता. आज तो पॉलिटेक्निकला आहे. आठ लोकांचं कुटुंब ना जमीन ना उत्पन्नाचे साधन. मोठा मुलगा २१ वर्षांचा तो डी. एड. करीत होता. त्याची भेट पहांदी पारी कुपार लिंगो संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर यांच्याशी गावातल्या काही सुजान लोकांनी घालून दिली. खून करणाऱ्या माणसाचे कुटुंब अगदी शेजारीच राहत असल्यामुळे त्या भीतीने मुलांनी गाव सोडलं आणि जीवाच्या भीतीने ते गंगाझरी पोलिस स्टेशनला लागूनच असलेल्या घराजवळ किरायाने राहू लागले.
मोठ्या भावाला दिला धीर
जेव्हा हा मंगलेश सविता बेदरकर यांना दिसला तेव्हा त्यांनी त्याला म्हटलं की, तू आपलं शिक्षण पूर्ण कर. डी.एड. मध्ये मंगलेश शिक्षण घेत होता म्हणून काही कार्यकर्त्यांना भेटून संपूर्ण कुटुंब खमारीला शिफ्ट करण्याचं ठरवलं. तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची त्यांनी भेट घेतली. त्याप्रसंगी आ. विनोद अग्रवाल यांनी दोन हजार रुपये सविता बेदरकर यांच्या हातात दिले. कंत्राटी बेसवर कुटुंबातील एकाला काटी येथे लावून देण्यासाठी सविता बेदरकर यांना पाठपुरावा करण्यास सांगितले. त्या प्रयत्नाला यश आले आणि मंगलेशच्या कुटुंबातील एक व्यक्ती काटीच्या पीएससीमध्ये रोजंदारीवर कामाला रुजू झाला. सर्व कुटुंब काटीला शिफ्ट झालं.
यांनी दिला मदतीचा हात
जोपर्यंत मंगलेशचे शिक्षण होत नाही तोपर्यंत तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि आताचे आ. विनोद अग्रवाल यांनी एक हजार रुपये महिन्याला देण्याचे मान्य केलं. विजय बहेकार यांनी एक हजार रुपये देण्याचे मान्य केलं. इंदिरा सपाटे यांनी एक हजार रुपये देण्याचे मान्य केलं तर खांडेकर यांनी किराणा भरून देण्याचे मान्य केलं आणि हे कुटुंब पोटापाण्याला लागलं.
स्पर्धा परीक्षेची केली तयारी
होता होता पोरं मोठी झाली आणि हळूहळू आठव्या वर्गापासून सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात दाखल झाली. वसतिगृहात राहून रंजिता गिरी, कांचन गिरी यांनी जीवतोड अभ्यास केला. स्वतःच्या महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या स्पर्धा परीक्षेतूनच रंजिता गिरी हिची नागपूर पोलिस विभागात निवड झाली आणि कांचन गिरी हिची गोंदिया पोलिस विभागात निवड झाली.