गोंदिया : जिल्ह्यातील ८ हजार कोरोना योद्ध्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यात १५४२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, जगात थैमान घालणारा कोरोना आणखी पाय पसरू लागल्याने नागरिकांनी मास्क लावल्याशिवाय बाहेर फिरू नये असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी कळविले आहे.
अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आधी कोरोनाची लस लावायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ७९४१ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यात आरोग्य विभागातील ९०३७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६१९० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर १८९ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील २९६२ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १५४२ पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महसूल विभागातील ३९९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस द्यायची होती व त्यातील २०९ महसूल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत नागपूर, वर्धा व चंद्रपूर या ३ जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून परत येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे कोरोनाचे रुग्ण समोर येत नाहीत, असा प्रश्न पडला असल्यामुळे आता आरोग्य विभाग कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देत आहे.
------------------------
कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. समाजात वावरत असताना किंवा घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावे. चाचण्या वाढविण्यावर आम्ही भर देत आहोत.
डॉ. नितीन कापसे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.