जिल्ह्यात लसीकरणाने गाठला ४१ टक्क्यांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:47+5:302021-07-20T04:20:47+5:30
गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ...
गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ४१ टक्क्यांचा टप्पा गाठला असून, रविवारपर्यंत (दि. १८) ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने खंड पडत असलेल्या लसीकरणाला पुन्हा गती आल्याचे दिसत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर नागरिकांचे लसीकरण किती गरजेचे आहे हे दिसून आले. यामुळे शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही लसीकरणावर जोर दिला जात असून, यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यापासून लसीकरण शिबिर व मोबाईल युनिटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून लसीकरण केले जात आहे. याचे फलितही येत असून, आतापर्यंत जिल्ह्यात ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची ४०.९७ एवढी टक्केवारी आहे.
विशेष म्हणजे, मध्यंतरी लसींचा तुटवडा होत असल्यामुळे कित्येकदा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला होता. अन्यथा जिल्हा ४१ टक्क्यांऐवजी ५० टक्के पार करून पुढे निघून गेला असता. मात्र, लसींचा साठाच नसल्याने लसीकरणात विघ्न आले व आकडेवारी घटली. मात्र, आता लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने लसीकरण पुन्हा एकदा जोमात सुरू करण्यात आले असून, त्याची गती वाढल्याचे दिसत आहे. यामुळे नक्कीच याचा फायदा मिळणार आहे, यात शंका नाही.
--------------------------------
१.४३ लाख तरुणांचे लसीकरण
जिल्ह्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला २२ जूनपासून सुरूवात झाली असून, तेव्हापासून या गटातील तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १,४३,२२९ तरुणांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यांची २२.९२ एवढी टक्केवारी आहे. यात १,३३,४१५ तरुणांनी (२१.३५ टक्के) पहिला डोस घेतला असून, ९ ८१४ तरुणांनी (१.५४ टक्के) दुसरा डोस घेतला आहे.
------------------------------
फक्त ८ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस
जिल्ह्यात जेथे आतापर्यंत ५,३२,४१३ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे तेथे फक्त ८.२३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४,२५,४९१ असून, त्याची टक्केवारी ३२.७४ एवढी आहे. फक्त १,०६,९२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्याची ८.२३ एवढी टक्केवारी आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे असल्याने नागरिकांनी वेळ येताच न चुकता लस घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.