रेशनवरील मोफत धान्य मिळणार गावांमध्ये मे महिन्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:22+5:302021-04-29T04:21:22+5:30
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहे. ...
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर आणूृन पानावर खाणाऱ्यांची सर्वाधिक गैरसोय झाली. मजूरवर्गाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार थांबला तरी रोटी थांबू नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारने अंत्योदय व बीपीएल लाभार्थी आणि केशरी रेशनकार्डधारकांना एक महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, जिल्ह्यात एप्रिल महिन्याचे स्वस्त धान्य आधीच वितरित झाले असल्याने मे महिन्यात रेशनवरील धान्य गावांमध्ये मोफत वाटप केले जाणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ४४७ रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. तसेच केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचासुद्धा लाभ या योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मे महिन्यात दिला जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळी रेशनकार्डधारकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील ९९९ स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्याचे वितरण केले जाणार आहे.
...........
मोफत धान्यात काय मिळणार
अंत्योदय, प्राधान्य गटातील आणि केशरी रेशनकार्डधारकांना नियमित ज्या स्वस्त धान्याचे वाटप केले जाते, तेच धान्य मोफत स्वरूपात वाटप केले जाणार आहे. यात प्रामुख्याने तांदूळ, गहू, डाळ आदींचा समावेश असणार आहे.
......
कोट
केंद्र आणि राज्य शासनाने घोषणा केल्यानुसार रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप १ मे पासून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांतून करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याचे धान्यवाटप झाले असल्याने हे धान्य मे महिन्यात वाटप केले जाणार आहे. याचा सर्व २ लाख २३ हजार ४४७ रेशनकार्डधारकांना लाभ मिळेल.
- देविदास वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
...............
एकूण रेशनकार्डधारकांची संख्या : २ लाख २३ हजार ४४७
रेशनकार्डचा प्रकार रेशनकार्डधारकांची संख्या
बीपीएल १ लाख ४४ हजार ५२९
अंत्योदय ७८५१८
केशरी २१८५०
........................................................
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा
मागील वर्षीसुद्धा कोरोनामुळे सहा महिने रोजगार नसल्यानेे रिकाम्या हाताने राहावे लागले. सर्वांकडून मदत मिळाल्याने कसेबसे दिवस निघाले. मात्र, आता पुन्हा महिनाभर लॉकडाऊन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न आहे. केवळ मोफत धान्य मिळाले म्हणजे सर्वच झाले असे नाही, तर बाकीच्या गरजा कशा पूर्ण होणार.
- अनिल रहिले, मजूर
...............
सध्या हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मोफत धान्यवाटपाची घोषणा केली असली, तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. अशा कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा बिकट प्रश्न आहे.
- तुमदेव पाल, मजूर
........................
शासनाने रोजगार थांबला म्हणून रोटी थांबणार नाही, असे सांगितले. मात्र, अद्यापही मोफत धान्य मिळाले नाही. त्यातच कुटुंबांच्या रोजच्या गरजा भागवायच्या कुठून, असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोफत धान्याप्रमाणेच शासनाने आर्थिक मदत करावी.
- विनायक सोनुले, मजूर