मागील ८ दिवसांपासून तिरोडा शहराचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:54 AM2021-02-18T04:54:43+5:302021-02-18T04:54:43+5:30
बिरसी फाटा : तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा होत असून, मागील ८ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून ...
बिरसी फाटा : तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा होत असून, मागील ८ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणीपुरवठा होत नसल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद आहे. पाण्याअभावी नागरिक बेजार झाले असून, नगर परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याची कुठलीही सूचना देण्यात न आल्याने नागरिक नाराज आहेत. ही अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून २ दिवसांत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे वर्तविली जात आहे.
तिरोडा शहरातील अंदाजे ३५०० नळधारकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वैनगगा नदीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. धापेवाडा उपसा सिंचन योजनेने धरणाची दारे बंद केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पुरवठा होत नसल्याने तिरोडा शहराचा पाणीपुरवठा मागील ८ दिवसांपासून बंद आहे. असे असतानाही शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याची कोणतीही सूचना नगर परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सुनील भांडारकर यांना विचारणा केला असता त्यांनी, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे धरणाचे दार बंद केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पाणीपुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाचे झिरपणारे पाणी विहिरीपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू असून २ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याकरिता प्राधिकरण व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज होती, असे तिरोडा शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.