१२ हजार शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून वेट अॅन्ड वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 09:33 PM2019-06-21T21:33:06+5:302019-06-21T21:33:48+5:30
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे त्यांना गेल्या आणि यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या शेतकऱ्यांना गरज भागविण्यासाठी पुन्हा एकदा सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने २७ जून २०१७ मध्ये शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. यातंर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्यात येणार होते. तसेच पात्र ठरलेल्या शेवटच्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहिल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
त्यानुसार अद्यापही ग्रीन, येलो, रेड याद्या तयार करण्याचे काम प्रत्येकच जिल्ह्यात सुरू आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ८७ हजार २७३ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी दोन वर्षांत ७५ हजार ८६६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २१८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या ८७ हजार २७३ शेतकऱ्यांपैकी १२ हजार २८७ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची मागील दोन वर्षांपासून बँकामध्ये पायपीट सुरूच आहे.
पीक कर्ज माफीचा आत्तापर्यंत सर्वाधिक लाभ गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६४ हजार ८११ शेतकऱ्यांना १७१ कोटी ५६ लाख रुपये, विदर्भ ग्रामीण बँकेच्या ३ हजार ८९४ शेतकऱ्यांना ११ कोटी ८६ लाख रुपये आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ हजार ५८५ सभासद शेतकऱ्यांना ३५ कोटी ७९ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.
दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु असताना अद्यापही पूर्ण पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना दररोज बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.
यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या असून त्या मंजुरीसाठी पाठविल्या असल्याचे सांगितले.
पीक कर्जापासून वंचित
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १२ हजार २८७ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून नवीन पीक कर्जाची उचल करण्यास अडचण जात आहे. जोपर्यंत त्यांचे कर्ज खाते निरंक होत नाही तोपर्यंत बँका त्यांना नवीन पीक कर्ज देणार नाही. तर पात्र शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफी मिळण्यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे.
शेतकरी सावकारांच्या दारात
मागील दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असून यासाठी पात्र ठरलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रक्कम जमा झाली नाही. त्यांची फार कोंडी झाली आहे.जुने कर्ज निरंक झाले नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे त्यांना मागील दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामासाठी नातेवाईक आणि सावकारांकडून कर्जाची उचल करुन गरज भागावावी लागत आहे.परिणामी पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात उभा असल्याचे चित्र आहे.