श्री गुरूदेव क्रांतीज्योत यात्रेचे स्वागत
By admin | Published: August 25, 2016 12:20 AM2016-08-25T00:20:46+5:302016-08-25T00:20:46+5:30
अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार कार्यालय गुरुकुंज आश्रम
गुरूदेव सेवकांची मागणी: तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या
कोसमतोंडी : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार कार्यालय गुरुकुंज आश्रम ता. तिवसा जि. अमरावतीच्या वतीने आयोजित श्री गुरूदेव क्रांती ज्योत यात्रा भंडारा जिल्ह्यातून खमाटा मार्गाने गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करतांनी गोंदिया जिल्ह्याच्या सिमेवर कोसमतोंडी येथे फुलीचंद भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोसमतोंडीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आपला भारत देश १५ आॅगस्ट १९४७ ला हुतात्म्यांच्या बलीदानातून इंग्रजांच्या गुलामगीरीतून स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्य लढ्यात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सक्रिय सहभाग होता. परंतु देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या इतिहासात याचा कुठेच उल्लेख नाही. भारताचा राष्ट्रपुरूषांच्या यादीत अजूनपर्यंत वंदनीय राष्ट्रसंताचा नावाचा उल्लेख नाही. तुकडोजी महराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. ही माहिती लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. याकरीता गुरूकुंज आश्रमाच्या वतीने क्रांतीज्योत यात्रा ९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान आयोजित केली आहे.
क्रांतीज्योत यात्रेचे गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या फुलीचंदजी भगत विद्यालयात २३ आॅगस्टला सकाळी ११ वाजता आगमन झाले. विद्यार्थ्यांनी या क्रांतीज्योतीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. याप्रसंगी गुरूकुंज आश्रम मोझरीचे केंद्रीय समितीचे प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे यांनी जीवन शिक्षण व ज्ञान रचनावाद यावर आधारीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पुष्पा मेश्राम यांना सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र शासन द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पारितोषीक मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक गोंदिया जिल्हा सेवाधिकारी हभप मुन्नालाल ठाकुर यांनी श्री गुरूदेव क्रांतीज्योत यात्रेचा उद्देश सांगितला. याप्रसंगी कवळू तोंडरे, अहिल्या गोखले, संत बांगळूबाबा संस्थेचे संस्थापक जगदीश येळे, भोजराज बिसेन, अशोक हरिणखेडे, श्रीराम शरणागत, विठ्ठलराव बावणकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी.येळे उपस्थित होते. (वार्ताहर)
सरस्वती विद्यालयात आज
आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील सरस्वती विद्यालयात श्री गुरूदेव सेवा मंडळाची क्रांती ज्योत यात्रा २५ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता दाखल होणार आहे. तेथे गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांना व नागरिकांना तुकडोजी महाराजांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी श्री गुरूदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे उपस्थित राहणार आहेत. गुरूदेव प्रेमींनी अधिक संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन हभप. एम.ए. ठाकूर, नरेश रहिले व इतरांनी केले आहे.