विजय मानकर
सालेकसा (गडचिरोली) : संपूर्ण आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले सालेकसा तालुक्यातील कचारगड धनेगाव येथील कचारगड यात्रा मध्य भारतातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. ही कचारगड यात्रा ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आदिवासी भाविकांना तसेच इतर पर्यटकांना जीवघेणा खड्ड्यातून यात्रा करावी लागणार आहे. चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून ते अद्यापही बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे कचारगड यात्रेकरू खड्ड्यांतून प्रवास करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी माघ पौर्णिमेला येणाऱ्या कचारगड यात्रेत देशाच्या १८ राज्यांतून आदिवासी समाजाचे जवळपास पाच ते सहा लाख लोक येत असतात. श्रद्धेचे केंद्र असलेल्या कचारगड येथेसुद्धा कोराेना महामारीचा सतत तीन वर्ष जबरदस्त फटका बसला. यंदा पूर्ण क्षमतेने कचारगड यात्रा चालणार. यंदाच्या यात्रेत सहा ते सात लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सर्व विभागांची बैठक आयोजित केली होती. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. परंतु महत्त्वाचे म्हणजे कचारगडच्या दिशेने येणारे सर्व रस्ते दररोज अपघाताला आमंत्रण देत आहेत. पावलोपावली खड्डे पडले आहेत. यामध्ये आमगाव-सालेकसा-दरेकसा मार्ग, देवरी-सालेकसा-धनेगाव मार्ग, डोंगरगड-दरेकसा मार्ग, लांजी-सालेकसा-कचारगड मार्ग या मोठ्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर फक्त खड्डेच दिसून येत आहेत. अशात कचारगड यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची चारचाकी, दुचाकी वाहने कशी पुढे जाणार याची काळजी वाटत आहे.
यात्रेकरूंना बसणार फटका
जिल्हा मुख्यालयापासून या ठिकाणी जाण्यासाठी आमगाव ते दरेकसा हा रस्ता पूर्णत: खड्ड्यांमध्ये बदलला आहे. दिवसभरात जेवढे भाविक येत असतात, अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाताना कितीही सावधपणे वाहन चालवले तरी अपघात टाळता येत नाही. तिरखेडी-सालेकसा, पिपरिया-धनेगाव रस्ता यासह चारही दिशांनी येणारे रस्ते पूर्णत: खड्ड्यांमध्ये रूपांतरित झाले. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या यात्रेकरूंनाही त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- दुर्गाप्रसाद कोकोडे, अध्यक्ष, कचारगड देवस्थान समिती, धनेगाव (दरेकसा)