तिरोडा : तालुक्यातील वडेगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नाही त्यांचे पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे चोरखमारा जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही, त्यामुळे पीक वाळल्यावर पाणी सोडणार का, असा सवाल माजी सभापती नीता रहांगडाले यांनी उपस्थित केला आहे.
पावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर असल्याने ६ जुलै रोजी माजी सभापती नीता रहांगडाले यांनी चोरखमारा जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन चोरखमारा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे अद्यापही जलाशयाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी उडावाउडवीची उत्तरे देत आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता आठ दिवसांत पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले; पण अद्यापही जलाशयाचे पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चोखमरा जलाशयाचे पाणी आठ दिवसांत न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नीता रहांगडाले यांनी दिला आहे.