शिरपूर बांध (गोंदिया) : गर्भाशयाच्या पिशवीवरील शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या इजेमुळे महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप करीत डॉ. आनंद गजभिये यांच्या विरोधात मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे. मृत महिलेचे नाव शिल्पा हेमराज मेश्राम (४१,रा शिरपूरबांध) असे आहे.
शिल्पा मेश्राम यांना ३१ मे रोजी गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १ जून रोजी तिच्यावर डॉ. आनंद गजभिये यांनी शस्त्रक्रिया केली. यानंतर तिच्यावर उपचार सुरू असतानाच ३ जून रोजी रात्री ९ वाजता दरम्यान शिल्पा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने राऊंडवरील डॉक्टरांनी तपासणी करून उपचार केला. परंतु प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने ४ जून रोजी पहाटे काही चाचण्या केल्या. त्यानंतरही काहीच सुधारणा नसल्याने डॉक्टरांनी तिला गोंदियाला केटीएस रुग्णालयात रेफर केले. यावर हेमराज मेश्राम शिल्पा यांना घेऊन आले व केटीएस रुग्णालयात भरती केले. केटीएस रुग्णालयातील डॉक्टरांनीही काही चाचण्या केल्या व शिल्पा यांना नागपूरला रेफर केले. मात्र हेमराज यांनी त्यांना नागपूरला न नेता सहयोग हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती केले. याप्रसंगी डॉ. गजभिये सोबत होते व शिल्पा यांना रुग्णालयात भरती करून ते निघून गेले.
रविवारपर्यंत (दि.११) शिल्पा यांच्यावर तेथेच उपचार करूनही काही सुधारणा न झाल्याने सहयोग हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना नागपूरला रेफर केले. यावर हेमराज त्यांना घेऊन सायंकाळी ७:३० वाजता निघाले असता कोहमाराजवळ शिल्पा यांचा मृत्यू झाला. यावर हेमराज शिल्पा यांचा मृतदेह घेऊन थेट शिरपूरला गेले व तेथून त्याच रुग्णवाहिकेने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात आले. तेव्हा ड्यूटीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही शिल्पा यांना मृत घोषित केले. दरम्यान, सोमवारी (दि.१२) केटीएस रुग्णालयात शिल्पाच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.
मृताच्या नातेवाइकांची पोलिसांत धाव...
- डॉक्टरांनी शिल्पा यांना मृत घोषित केल्यानंतर रविवारी रात्रीच हेमराज व नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठून डॉ. गजभिये याच्या हलगर्जीपणामुळे शिल्पाच मृत्यू झाल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे. तसेच शिल्पाचा मृतदेह रात्री देवरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता. मात्र या प्रकारामुळे गावकरी व मृतांच्या नातेवाइकात डॉ. गजभिये यांच्या विरोधात चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे.
कारवाई काय होणार...?
- हा सगळा प्रकार घडल्यानंतर डॉ. गजभिये यांनी सगळे आरोप फेटाळले आहे. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी रुग्णाला अत्यवस्थ बघितले. त्यावेळी डॉक्टरने उडवाउडवीची उत्तरे दिली. या सगळ्या प्रकारामुळे डॉक्टरचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे डॉ. गजभियेवर व्यवस्थापक मंडळ व देवरी पोलिस नेमकी कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
मृत महिलेच्या नातेवाइकांनी रविवारी (दि.११) रात्री डॉ. गजभिये यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. डॉक्टरांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. मृताच्या शवविच्छेदन व डॉक्टर व्यवस्थापक मंडळाच्या अहवालानतंरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रवीण डांगे, पोलिस निरीक्षक, देवरी
मृताच्या नातेवाइकांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत. त्या महिलेचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी मला न सांगता गोंदिया येथे रेफर केले. नंतर त्यांनी काय केले मला माहिती नाही. परंतु माझ्याकडून कोणतीही अनुचित शस्त्रक्रिया करण्यात आली नाही.
- डॉ. आनंद गजभिये, ग्रा. रुग्णालय, देवरी