दारुबंदी समितीच्या महिलांना सहकार्य नाही
By Admin | Published: June 5, 2017 12:57 AM2017-06-05T00:57:15+5:302017-06-05T00:57:15+5:30
ग्रामपंचायत आमगाव खुर्द अंतर्गत संपूर्ण दारुबंदी व्हावी म्हणून येथील महिलांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून धरणे आंदोलन, निवेदने व सभा आदी अनेक पाऊले उचलली आहेत.
मदतीसाठी दारे ठोठावले : अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ग्रामपंचायत आमगाव खुर्द अंतर्गत संपूर्ण दारुबंदी व्हावी म्हणून येथील महिलांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून धरणे आंदोलन, निवेदने व सभा आदी अनेक पाऊले उचलली आहेत. परंतु सदर महिलांचा आवाज कोणीही ऐकायला तयार नसून आपले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न अधिकारी- पदाधिकाऱ्यांपासून काही समाजकंटकांंसह सर्वच करीत असल्याचा आरोप दारूबंदी महिला समितीने केला आहे.
गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी त्या संदर्भाचे निवेदन ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, आबकारी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा अनेकवेळा दिले. परंतु या संदर्भात आतापर्यंत कोणतेही पाऊल संबंधीत विभागाने उचलले नाही. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड रोष आहे. गावात दारूबंदी व्हावी की नाही या संदर्भात २६ एप्रिल रोजी ग्राम पंचायत आमगाव खुर्द येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेत रीतसर चर्चा न करता फक्त गोंधळ घालण्याचे काम काही लोकांनी केल्यामुळे महिलांनी पोलीस स्टेशनला धडक दिली होती.
त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी संबंधीत अधिकारी-पदाधिकारी यांना पाचारण करुन पुढे या विषयी व्यवस्थीत ग्राम सभा घेवून दारूबंदीचा विषय मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ३१ मे रोजी ग्राम सभा घेण्याचे ठरविले होते.
त्यानुसार पुन्हा गावातील महिलांनी ग्राम पंचायतला धडक दिली. परंतु त्यांच्या विषय घेण्यात आला नाही. तेव्हा त्यांनी खंडविकास अधिकारी आणि त्यानंतर तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली व निवेदन दिले. यावेळी महिलांनी बीडीओ आणि तहसीलदार यांच्या दालनात जाऊन रोखठोक भाषेत चर्चा केली व आठ दिवसात योग्य कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
महिलांची मागणी लक्षात घेता ग्रामपंचायतीने त्या दिशेने रितसर पाऊल उचलून योग्य ती कारवाई केली पाहिजे. पुढे या बाबतीत आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिले.
२६ एप्रिलच्या ग्रामसभेत चर्चा न झाल्याने पुढे ३१ मे च्या ग्रामसभेत चर्चा करण्यात येईल, असे बोलले गेले होते. परंतु ३१ मेच्या सभेत इतर विषयांचा समावेश असल्याने त्यावर चर्चा झाली आणि दारुबंदीची चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, असा सल्ला सभेत देण्यात आला. त्यामुळे ३१ मे ला दारूबंदीचा विषय घेण्यात आला नाही. पुढे दारुबंदीसाठी विशेष ग्राम सभा बोलावून दारुबंदीवर विस्तृत चर्चा करण्यात येईल.
-योगेश राऊत
सरपंच, आमगाव खुर्द