महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे घेतली धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:49 AM2018-06-23T00:49:01+5:302018-06-23T00:49:19+5:30
बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. बचत गट फक्त गटच बनून राहिले नाही तर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघू व कुटीर उद्योगाकडे धाव घेतली आहे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. बचत गट फक्त गटच बनून राहिले नाही तर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघू व कुटीर उद्योगाकडे धाव घेतली आहे, असे प्रतिपादन माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे यांनी केले.
हलबीटोला येथे अर्धनारेश्वरालय येथे महिला सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया-महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जयसेवा लोकसंचालिका साधन केंद्र पिपरीयाद्वारे प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रामुख्याने नगराध्यक्ष विरेंद्र उईके, विलास सुरंदर मुंबई, राजगिरे, जि.प. सदस्या दुर्गा तिराले, पं.स. सदस्य भरत लिल्हारे, न.प. उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, अर्धनारेश्वरालय ट्रस्ट अध्यक्ष गोविंदराम वरकडे, एम.ई. टेंभरे, आर.एम. वराडपांडे, एलडीसी कोरे, शालू साखरे उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व महिलांना जीवनोपयोगी मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. मुद्रा लोन, शेळी पालन, व्यावसायिक उद्योग धंदे यावर सविस्तर माहिती देण्यात आली. शिवशक्ती ग्रामसंस्था हलबीटोला येथील प्रथम दर्शनिय बोर्डाचे अनावरण व गौण वनोपज खरेदी केंद्राची सुरूवात सुद्धा करण्यात आली. कार्यक्रमात सर्व महिलांच्या आरोग्य सेवेसाठी एचबी कॅम्प घेण्यात आले. विविध उद्योजक स्टॉल्स लावण्यात आले. माहिती सांगण्यात आली. तसेच सीएमआरसी पुस्तकाचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बचत गटाच्या महिलांनी नृत्य सादर करुन शिक्षण व जागरुकता यावर माहिती सादर केली.
संचालन ललीता वडगाये यांनी केले. प्रास्ताविक अली सय्यद यांनी मांडले. आभार करंडे यांनी मानले.