घरकुलामुळे मिळाला मजुरांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:00 AM2018-03-16T00:00:48+5:302018-03-16T00:00:48+5:30
कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अतंर्गत घरकूल व ग्रामपंचायतची कामे केली जात आहे. त्यामुळे मजुरांना घरकुलाचा आधार होत असल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या काम दिले जाते. यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सदर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३२४ घरकुलांची कामे सुरू असून त्यावर १४८२ मजूर कामावर आहेत.
दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने पांदण व सिमेंट रस्ता, तलाव खोलीकरण, भातखाचर विहीर, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, शेळी व गायीचा गोठा बांधकाम, घरकुल व शौचालयांची कामे केली जातात. गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु केली असून यावर्षी जिल्ह्यात घरकुलांचे सर्वाधिक कामे घेण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात सदर योजनेंतर्गत घरकुलांचे काम सुरु आहे. १४ मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण ३२४ घरकुलांची कामे सुरु आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यात ६२ कामे सुरू असून त्यावर ४९२ मजुरांची उपस्थिती आहे. तिरोडा तालुक्यात १४ कामांवर ६८ मजूर, सालेकसा ९८ कामांवर ३०४ मजूर, देवरी ७२ कामांवर २६८ मजूर, गोरेगाव २ कामावर ८ मजूर, सडक अर्जुनी १७ कामांवर ६८ मजूर तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३० कामांवर १५९ मजूर कामावर आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.
गोरेगाव तालुका माघारला
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली जातात. सध्या स्थितीत ग्रामपंचायत स्तरावरुन जिल्ह्यात घरकुलांची ३२४ कामे सुरु आहे. गोरेगाव तालुक्यात सदर योजनेंतर्गत फक्त दोनच कामे सुरु असून घरकुल बांधकामात गोरेगाव तालुका पिछाडीवर असल्याचे चित्र आहे