रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन हवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:26+5:30
गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : निवडून येताच १५ दिवसांच्या आत गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपार पाळीत लोकल रेल्वे गाडी सुरू करुन देऊ असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले होते. परंतु १०० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी कुठल्याच हालचाली नाहीत. त्यामुळे या भागातील जनता ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल करीत आहे.
गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनतेच्या मागणीनुसार प्रवासी गाड्यांची गरजेनुसार सोय करुन देणे आवश्यक आहे. डोंगरगड-गोंदिया दरम्यान चालणाऱ्या लोकल गाड्या बहुतेक दुर्ग आणि इतवारी या मार्गावर चालणाऱ्या असतात. यातील काही गाड्या गोंदियापर्यंत तर काही गाड्या डोंगरगडपर्यंतच चालतात. परिणामी सालेकसा, आमगाव, डोंगरगढ परिसरातील प्रवाशांचा विचार करुन दुपारी १ किंवा दोन वाजताच्या दरम्यान दोन्ही बाजूने रेल्वे गाडीची सोय झाली तर हजारो प्रवाशांना याचा लाभ होईल.
रेल्वे विभाग केंद्र शासनातंर्गत येत असून रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अशात केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदारांची ही पहिली जबाबदारी ठरते, ही बाब लक्षात घेता लोक मागील अनेक वर्षांपासून खासदारांकडे यासाठी मागणी करीत आहे. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र गडचिरोली लोकसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. मागील १० वर्षांपासून या क्षेत्रातील जनतेची नाळ खासदारांसोबत कधीच जुळली नाही. त्यामुळे सुद्धा समस्या कायम आहे. या परिसरात लोकल रेल्वे गाडी सुरु करण्यासह रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची समस्या ही कायम आहे. धानोली ते बाम्हणी मार्ग, दरेकसा ते भर्रीटोला मार्ग मागील ५० वर्षांपासून तशीच आहे.
या समस्या जतनेने वेळोवेळी लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या, मात्र त्या अद्यापही मार्गी लागल्या नाही. विद्यमान खासदार नेते यांनी सुद्धा लोकल रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसांचा कालावधी लोटूनही ही समस्या मार्गी लागली नाही.
खासदार साहेब नेहमी संपर्काबाहेर
सालेकसा-आमगाव तालुक्यातील लोक आपल्या समस्या सोडविण्यासाठी जेव्हा-जेव्हा खासदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा-तेव्हा खासदार महोदय संपर्काच्या बाहेर असतात. फोन लावला तरी उचलत नाही. त्यांच्या स्वीय सहायकाला संपर्क केला तर त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही.
निवडून आल्यानंतर सालेकसा-आमगाव येथे सत्काराप्रसंगी खासदारांनी जाहीर सभेत बोलताना रेल्वेची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आतापर्यंत काहीच केले नाही. लोकांना आपल्या मागणीसाठी आता आंदोलन करावेच लागेल.
-सुनील असाटी,
सामाजिक कार्यकर्ता