कालीसरार धरणात बुडून तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:23+5:302021-05-05T04:48:23+5:30
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या कालीसरार धरणावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ...
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या कालीसरार धरणावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ४ मे च्या दुपारी ४.३० वाजता दरम्यान कालीसरार धरणात घडली. अमित जनबंधू (२६) रा. भागी ता. देवरी असे मृत तरूणाचे नाव आहे.
संचारबंदीमुळे आपापल्या घरी असलेले चार मित्र एकत्र येऊन पार्टी करायची म्हणून त्यांनी कालीसरार धरणावर पार्टी करण्याचा चंग बांधला. परंतु पार्टी करण्यासाठी धरणावर गेलेल्या चार मित्रांपैकी एक मित्र आंघोळ करण्यासाठी धरणाच्या ओव्हरफ्लो खाली आंघोळ करायला उभा झाला. परंतु त्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेवाळ झाले होते. त्या शेवाळावरून त्याचा पाय घसरल्याने तो २५ ते ३० फूट खोल असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. अमित सोबत गिधाडी येथील मुकेश हरिणखेडे (२७), पिपरीया येथील दिनश उईके (२९) व आलेबेदर येथील फुलीचंद मरस्कोल्हे (३५) हे होते. पार्टी करण्याच्या अगोदरच ही घटना घडल्याने त्यांची पार्टी होऊ शकली नाही. मृतक अमित जनबंधूचा मृतदेह शोधताना सायंकाळ झाली तरीही त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता. अंधार झाल्यामुळे बुधवारी त्याचा मृतदेह शोधण्यात येणार आहे असे सालेकसाचे ठाणेदार प्रमोदकुमार बघेले यांनी सांगितले आहे.