सव्वा लाख रुपयांच्या लाचेने झेडपी चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:53 PM2018-03-15T23:53:35+5:302018-03-15T23:53:35+5:30
काम करून देण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती व त्याच्या सहकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना गुरूवारी (दि.१५) घडली.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : काम करून देण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती व त्याच्या सहकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना गुरूवारी (दि.१५) घडली. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत विविध चर्चेला उधान आले असून अधिकारी व कर्मचाºयांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे चित्र होते.
जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एखाद्या पदाधिकाºयाला त्याच्या कक्षात सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची ही पहिलीच घटना होय. जि.प.मध्ये काँग्रेस-भाजपा युतीची सत्ता आहे. महिनाभरापूर्वीच विषय समितीच्या पाचही सभापतींची निवड करुन खाते वाटप करण्यात आले. त्यात समाजकल्याण सभापतीपदी भाजपाचे विश्वजीत डोंगरे यांची वर्णी लागली. पदभार स्विकारल्यानंतर महिनाभरातच सव्वा लाख रुपयांची स्वीकारताना ते लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अकडले. मागील काही दिवसांपासून जि.प.बांधकाम विभागात कमिश्न घेतल्याशिवाय कामे होत नसल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेला सुध्दा या घटनेमुळे दुजोरा मिळाला आहे. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.