चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

By admin | Published: August 26, 2016 01:27 AM2016-08-26T01:27:45+5:302016-08-26T01:27:45+5:30

तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने

ZP does not have the right to churni pond! | चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

Next

वनविभागाची मालकी : अदानी प्रकल्पाला तीन महिन्यांपूर्वीच हस्तांतरित
तिरोडा : तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या कामासाठी फोडल्याने त्या तलावात मासेमारी करणाऱ्या संस्थेसह काही शेतकऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेने त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र वनविभागाच्या मालकीची ती जागा तीन महिन्यांपूर्वीच अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली असल्याने जिल्हा परिषदेचा त्यावरील अधिकारच संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
त्या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी नसताना जि.प.ने संबंधित मच्छीमार संस्था व शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचे दिसून येत आहे. तिरोड्यात गुरूवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी व तहसीलदार चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना त्या तलावाच्या मालकी हक्कासंदर्भात जिल्हा परिषदेकडे काय कागदपत्रे आहेत? असा प्रश्न केला. मात्र बिडीओंनी त्यासंदर्भात अनभिज्ञता दर्शवित केवळ परंपरेने जिल्हा परिषदेकडून त्या तलावाचा लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हा तलाव आदर्श मत्स्यपालन संस्थेला जि.प.ने लिलावात दिला होता. त्यानंतर अलिकडे तर प्रत्यक्ष लिलाव न करताच केवळ ‘वाटाघाटी’ करून आदर्श मत्स्यपालन संस्थेच्या परवान्याचे नुतनीकरण जिल्हा परिषदेकडून केले जात होते. मात्र प्रत्यक्षात या तलावाच्या जागेवर झुडूपी जंगल होते तेव्हापासून त्याची मालकी वनविभागाची आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच ती जागा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे त्या जागेवरील जिल्हा परिषदेचा अधिकार संपुष्टात आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात अदानी व्यवस्थापनाच्या वतीने त्या तलावाची पाळ फोडल्यामुळे त्यातील पाणी वाहून गेले. यामुळे मत्स्यपालन संस्थेच्या संचालकांनी व काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला.
चुरडी येथील शेतकरी जनजीवन जांभुळकर यांनी सांगितले की, त्या तलावात राख टाकून दुषित पाणी मिळेल ते नको आहे. सरपंच सचिन कराडे यांनी शेतकऱ्यांना त्या तलावातून नियमित पाणी मिळाले पाहिजे असे सांगितले. पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. दुसरीकडे मासोळ्या सुद्धा गेल्याने संबंधित मत्स्यपालन संस्थेचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतू तलाव आम्हाला हस्तांतरित झाल्यामुळे त्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, असे अदानी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरूवारी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी तलावाला भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सामजिक कार्यकर्ता शामराव झरारीया, मोहन ग्यानचंदानी, देवेंद्र तिवारी, चुरडीचे सरपंच सचिन कराडे व परिसरातील बरेच शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

- कागदपत्रे पहा, मग ठरवा
यासंदर्भात अदानी व्यवस्थापनाचे अधिकारी डी.जे. नागपुरे यांनी सांगितले की, ती जागा केंद्र सरकारकडून अदानी व्यवस्थापनाला मिळाली आहे. त्याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही ते संबंधितांना दाखवून संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थेने आमच्याकडे येण्याऐवजी त्यांना कंत्राट देणाऱ्या जिल्हा परिषदेकडे दाद मागावी.
जर वन विभागाने या तलावाची जागा अदानीला हस्तांतरित केली आहे तर जि.प. ने मासोळ्यांसाठी कंत्राट कसे दिले? शेतकऱ्यांना कित्येक वर्षापासून पाणी मिळत होते त्यांना न कळविता जिल्हा परिषदेने त्यांना अंधारात का ठेवले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

दंडात्मक कारवाई करू-मेंढे
या प्रकरणी अदानी प्लान्टने केलेल्या नुकसानीसाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी संबंधित तलाव पाहणी केल्यानंतर गराडा-चुरडी येथील शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. मात्र तो तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा नसताना जिल्हा परिषदेला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: ZP does not have the right to churni pond!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.