कॅन्सरवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत म्हणून ॲक्सिस बँक देणार १०० कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 07:39 AM2024-03-19T07:39:50+5:302024-03-19T07:40:22+5:30
कॅन्सर ग्रीडच्या अंतर्गत देशातील ३०० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णालयांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कॅन्सर आजारावर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी ॲक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला १०० कोटींचा निधी देणार आहे. या ग्रीडच्या अंतर्गत देशातील ३०० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णालयांचा समावेश आहे. येत्या पाच वर्षांच्या काळात कॅन्सर आजाराच्या उपचारात अत्याधुनिक बदल करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
या ग्रीडच्या समन्वयकाचे काम टाटा मेमोरिअल हॉस्पिटलतर्फे करण्यात येते. येत्या पॅकेज वर्षात काही प्रमुख प्रकल्पांवर काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये नॅशनल ट्युमर बायोबँक, नॅशनल कॅन्सर टेलिकन्सल्टेशन नेटवर्क आणि कॅन्सर निगडित इलेक्ट्रोनिक मेडिकल रेकॉर्ड या प्रकल्पांचा समावेश आहे. याचा अंतर्भाव केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये करण्यात येणार आहे. ॲक्सिस बँक आणि टाटा मेमोरियल सेंटर या दोघांमध्ये या कामासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
त्यावेळी बँकेतर्फे उप व्यवस्थापकीय संचालक राजीव आनंद, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक आणि नॅशनल कॅन्सर ग्रिडचे निमंत्रक डॉ. सी. एस. परमेश, कॅन्सर वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंजू सेनगर उपस्थित होते. सामंजस्य करारावेळी आनंद यांनी सांगितले की, “नॅशनल कॅन्सर ग्रिड आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल सोबत कॅन्सर संशोधन आणि कॅन्सर उपचार याकरिता भागीदारी करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”