कोरोना व्हायरसचे (CoronaVirus) उपाय शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरस पुन्हा स्ट्रेन बदलत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेली औषधं निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांमध्येच आहे. दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. योगगुरू बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी कोरोनावर रामबाण उपाय (Medicine for Coronavirus) शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत. आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली.
रामदेव बाबा यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर (COVID-19) उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
याआधीही रामदेव बाबांनी कोरोनाचे उपचा शोधण्याचा दावा केला होता. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते म्हणून बुस्टर असं या औषधाला म्हटलं होतं आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP - WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील.
''आजचा ऐतिहासिक असून छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती आहे. एव्हिडन्स मेडिसीन्स म्हणून एव्हिडन्स आधारित संशोधन आहे. की वैद्यकीय क्षेत्रात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल,'' असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले.
मी कोरोनाची लस घेणार नाही; आमचा योगावतार जिंदाबाद आहे
मी कोरोनाची लस घेणार नाही. मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं होतं. एका वृत्तवाहिनीवर बोलताना बाबा रामदेव म्हणाले होते की, "कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये, असं बाबा रामदेव यांनी सांगितले.
मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, '' मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे,'' असं बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच कोरोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी कोरोनाची लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही, असं बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले होते.