सुंदर दिसायचय तर मग दिवसातला एक तास योगासनं आणि प्राणायाम कराच!
By Admin | Published: June 21, 2017 06:46 PM2017-06-21T18:46:13+5:302017-06-21T18:46:13+5:30
योगानं शरीराची आंतरिक ऊर्जा वाढते. योगामुळे मन उजळतं. पण याच योगामुळे तुमचं शरीर आकर्षक होतं आणि चेहेऱ्यावरही तेजस्वीपणा येतो.
- माधुरी पेठकर
योगा आणि आरोग्य, योगा आणि फिटनेस याबद्दल सध्या खूप बोललं जातं. उत्तम आरोग्यासाठी योगा करण्यावर अनेकांचा भर असतो. नियमित योगा केल्यानं केवळ आपण सुदृढ होतो असं नाही तर सुंदर आणि सुडौलही होतो. योगा आणि सुंदरता यांचा खूप जवळचा संबंध आहे. नियमित योगासनं आणि त्यासोबत प्राणायाम केला तर वय कितीही वाढलं तरी शरीराचा आकार सुडौल राहतो आणि चेहेऱ्यावरची सुंदरता आणि तारूण्यही कायम राहातं.
योगानं सुंदर दिसता येतं हे खरं मात्र त्यासाठी नियमित योगासनाची कडक शिस्त मात्र पाळावीच लागते. योगासनांबरोबरच योग्य आहाराची सवयही लावून घ्यावी लागते. त्यामुळे योगासनं करून जे मिळतं ते मग दिर्घकाळ टिकवता येतं.
योगानं शरीराची आंतरिक ऊर्जा वाढते. योगामुळे मन उजळतं. पण याच योगामुळे तुमचं शरीर आकर्षक होतं आणि चेहेऱ्यावरही तेजस्वीपणा येतो.
योगामुळे शरीर लवचिक होतं. बसताना, हालचाल करताना बॉडी पोश्चर सुधारतं. नियमित योगासनांमुळे व्यक्तिमत्त्वाचा रूबाब वाढतो. शरीर आणि मनाला शिस्त लागते. ही स्वयंशिस्त अंगी बाणवण्यासाठी योगासन आणि प्राणायामसारखा दुसरा उपाय नाही.