- माधुरी पेठकरयोगा आणि आरोग्य, योगा आणि फिटनेस याबद्दल सध्या खूप बोललं जातं. उत्तम आरोग्यासाठी योगा करण्यावर अनेकांचा भर असतो. नियमित योगा केल्यानं केवळ आपण सुदृढ होतो असं नाही तर सुंदर आणि सुडौलही होतो. योगा आणि सुंदरता यांचा खूप जवळचा संबंध आहे. नियमित योगासनं आणि त्यासोबत प्राणायाम केला तर वय कितीही वाढलं तरी शरीराचा आकार सुडौल राहतो आणि चेहेऱ्यावरची सुंदरता आणि तारूण्यही कायम राहातं.योगानं सुंदर दिसता येतं हे खरं मात्र त्यासाठी नियमित योगासनाची कडक शिस्त मात्र पाळावीच लागते. योगासनांबरोबरच योग्य आहाराची सवयही लावून घ्यावी लागते. त्यामुळे योगासनं करून जे मिळतं ते मग दिर्घकाळ टिकवता येतं. योगानं शरीराची आंतरिक ऊर्जा वाढते. योगामुळे मन उजळतं. पण याच योगामुळे तुमचं शरीर आकर्षक होतं आणि चेहेऱ्यावरही तेजस्वीपणा येतो.
शरीर बाहेरून ताजंतवानं दिसायचं असेल तर शरीराच्या आतील टाकाऊ आणि विषारी घटक बाहेर टाकले जायला हवेत. योगामुळे डिटॉक्सीनेशनची प्रक्रिया घडते. शरीर आतून शुध्द होतं. योगामुळे रक्तप्रवाह सुधारतो. आणि त्याचाच परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. योगामुळे त्वचेचं आणि केसांचं आरोग्य सुधारतं. त्वचा आणि केस योगामुळे चमकतात. योगामुळे आपलं शरीर अन्नातले पोषक द्रव्यं शरीरात पूर्ण क्षमतेनं खेचून घेण्यास सबळ होतं. योगामुळे अन्नातील पोषक द्रव्य खेचण्याची पेशींची क्षमता वाढते. योगामुळे शरीरातील सर्व अवयव आपलं काम चोख करायला लागतात. आणि त्याचाच परिणाम म्हणजे चेहेऱ्यावरचं तेज वाढतं. इतकंच नव्हे तर संपूर्ण शरीरभर चैतन्य वाहात असल्याचा अनुभव नियमित योगा केल्यानं घेता येतो. आपला मूड कसा आहे यावरही आपण कसं दिसतो हे अवलंबून असतं. योगामुळे मूड सुधारतो. मनावरचा ताण हलका होतो. फक्त यासाठी योगासनांसोबतच प्राणायामचीही जोड द्यायला हवी. प्राणायाम योगा ही श्वासांवर नियंत्रण ठेवणारी कला आहे. एका विशिष्ट लयीत, शिस्तीत श्वास घेतला, सोडला, थांबवला की शरीर आणि मनाला त्याचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो. प्राणायाममुळे शरीरातील सर्व अवयव प्रफुल्लित होतात. मनही असंख्य ताणांच्या कचाट्यातून सुटून मोकळा आणि आनंदी श्वास घेतं. प्राणायाममुळे शरीर आणि मनाला जी शांती मिळते त्याचं प्रतिबिंब चेहेऱ्यावरच्या तेजात पाहायला मिळतं. रोज योगासनांसोबतच 30 मीनिटांचा प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुध्द आणि सुंदर होतं. यासाठी रोज काही योगासनं आणि त्यासोबत अनुलोम विलोम, कपालभाती, शितली प्राणायाम, भस्त्रिका, भ्रामरी प्राणायाम आण सोबत योगासनं केली तर सुंदर दिसण्यासाठी वरवरचे उपाय करावे लागत नाही.सौंदर्य शरीर आणि मनातून फुलून वर येतं.
योगाद्वारे फेशिअलफेशिअल करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये मुली आणि स्त्रिया काही शे रूपये मोजतात. बरं या फेशिअलमधून मिळणारा ग्लो तोही काही दिवसच टिकतो. पण योगाद्वारे हा ग्लो आपण घरच्याघरी, एक पैही खर्च न करता मिळवू शकतो. यासाठी ताठ उभं राहावं. दोन पायात आपल्या कंबरे इतकं अंतर ठेवावं. दोन्ही हातांच्या तळव्यांनी आधी आपला चेहेरा झाकावा. दहावेळा खोल श्वास घेवून तो पूर्णपणे बाहेर सोडावा. परत दहावेळा हीच प्रक्रिया करताना हातानं आपला चेहरा चोळावा. हुनवटीपासून वर चेहेरा बोटांनी हलका हलका चोळावा. हे जर रोज केलं तर चेहेरा मऊ होतो. चेहेऱ्यावरचं तेज वाढतं. आणि चेहेऱ्यावर सुरकुत्याही पडत नाही. पोट आणि कंबर कमी करण्यासाठी योगा.सुटलेलं पोट हे शरीर सौंदर्यात नेहेमीच बाधा आणतं. योगामुळे सुटलेल्या पोटाला ताळ्यावर आणता येतं. यासाठी योगामध्ये काही आसनं आहेत. यात एका प्रकारात ताठं उभं राहावं. दोन पायात कंबरे इतकं अंतर ठेवावं. दीर्घ श्वास घ्यावा. श्वास सावकाश सोडत खाली वाकावं. वाकताना गुडघे वाकणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येकवेळी श्वास सोडताना खाली वाकत हाताच्या बोटांनी पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा. या प्रकारच्या आसनात पोटावर ताण पडतो.हा आसन प्रकार केल्यानंतर सरळ ताठ उभं राहावं.दोन पायात कंबरेइतकं अंतर ठेवावं. डाव्या पायाच्या अंगठयाला उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करावा आणि उजव्या पायाच्या अंगठयाला डाव्या हाताच्या बोटंनी स्पर्श करावा. हे करतानाही गुडघे वाकवायचे नाहीत. यानंतर दोन पायात तसंच अंतर ठेवून दोन्ही हाताचे तळवे गुडघे न वाकवता जमिनीला टेकवावेत. आणि डोकं जमीनीच्या दिशेनं जास्तीत जास्त खाली न्यावं.
पोटासोबतच कंबरेवरही चरबी साठते. कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठीही योगा करता येतो. यासाठी ताठ उभं राहावं. दोन्ही पायात कंबरेइतकं अंतर ठेवावं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ पसरावेत. प्रथम डाव्या बाजूनं कमरेचा वरचा भाग वळवून जास्तीतजास्त मागे जाण्याचा प्रयत्न करावा. काही काळ याच अवस्थेत राहावं. नंतर उजव्या बाजूनं हा प्रयोग करावा. हे आसन करताना मान हलवायची नाही. हा प्रयोग किमान दहा वेळा करावा. नंतर दोन्ही पायात अंतर ठेवून ताठ उभं राहावं. दोन्ही हात कंबरेवर ठेवावेत. आणि एकदा डाव्या बाजूनं गुडघा न वाकवता खाली वाकत चेहरा मांडील लावायचा प्रयत्न करावा. हाच प्रयोग मग उजव्या बाजूनं करावा. शरीरावर जिथे जिथे चरबी साठते त्यापैकी मांडी हाही एक अवयव आहे . मांडीतली चरबी आटोक्यात ठेवण्यासाठी योगामध्ये एक आसन आहे. हे आसन करताना ताठ उभं राहावं. दोन पायात भरपूर अंतर ठेवावं. पायाचे तळवे बाहेरच्या बाजूनं वळवावेत. दोन्ही हात समोर ताठ ठेवावेत आणि गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारखी पोज घ्यावी. यामुळे मांडीवर ताण येतो. योगासनातली ही काही आसनं आहे ज्यामुळे शरीर सुडौल आणि आकर्षक होतं.
योगामुळे शरीर लवचिक होतं. बसताना, हालचाल करताना बॉडी पोश्चर सुधारतं. नियमित योगासनांमुळे व्यक्तिमत्त्वाचा रूबाब वाढतो. शरीर आणि मनाला शिस्त लागते. ही स्वयंशिस्त अंगी बाणवण्यासाठी योगासन आणि प्राणायामसारखा दुसरा उपाय नाही.