बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनात अनेक आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. डायबिटिज, सांधेदुखी, अनिद्रा आणि ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. सध्या अनेकांना सतावणारी समस्या म्हणजे हाय ब्लड प्रेशर. अनेक औषधं, उपचार करूनदेखील या समस्येपासून सुटका करून घेणं कठिणच. भारतात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची समस्या वेगाने वाढत आहे. ब्लड प्रेशरचा आजार तसा तर सामान्य वाटतो, मात्र याला वेळीच कंट्रोल केलं तर यामुळे हृदयरोग, स्ट्रोक या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. परंतु एका संशोधनातून ब्लड प्रेशरच्या समस्येबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, निळ्या प्रकाशात वावरल्याने रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर कमी होतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. ज्याप्रमाणे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी औषधं काम करतात, त्याचप्रमाणे निळ्या प्रकाशाचा फायदा होतो. औषधांमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे निळ्या प्रकाशामुळेही ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये काही ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर प्रयोग करण्यात आला. त्यावरून नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणांमधून निळा प्रकाश ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो, हे सिद्ध झाले.
'यूरोपीयन जर्नल ऑफ प्रिवेन्टेटिव कार्डियॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सहभागी करून घेण्यात आलेल्या लोकांचं शरीर 30 मिनिटांपर्यंत जवळपास 450 नॅनोमीटरपर्यंत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिले. जे दिवसा मिळणाऱ्या सुर्याच्या प्रकाशाच्या तुलनेत सारखेच होते. या दरम्यान दोन्ही प्रकाशांच्या परिणामांची तुलना करण्यात आली. सहभागी झालेल्या लोकांचे ब्लड प्रेशर, धमन्यांवर झालेला परिणाम, रक्त वाहिन्या आणि रक्त प्लाज्माचा थर यांचं मापन करण्यात आलं. त्यावरून नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणांनुसार निळ्या प्रकाशामुळे सर्व व्यक्तींचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले.
पराबॅगनी किरणांपेक्षा निळ्या प्रकाशामुळे कॅन्सरचा धोका नसतो. ब्रिटनमधील सरे विश्वविद्यालय आणि जर्मनीमधील हेनरिक हॅनी विश्वविद्यालय डसेलडार्फच्या संशोधकांना असं आढळून आलं की, पूर्ण शरीर निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्याने सहभागी लोकांचं ब्लडप्रेशर जवळपास 8 एमएमएचजीने कमी झालं. तेच साधारण प्रकाशात मात्र त्यावर काही परिणाम झाला नाही.
रक्तदाबाची कारणे :
रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते. त्यासोबतच ज्या लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अॅड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अॅड्रिनालीन व नॉरेअॅड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते. जे लोक जास्त मीठ खातात त्यांनाही याचा धोका असतो. तसेच स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो.