मुंबई : देशासह राज्यभरात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, मात्र या लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. लसीकऱणाविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमजुती असल्याचे दिसून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह स्थानिक व राज्य शासनानासह तज्ज्ञांनीही लसीविषयी गैरसमज बाळगू नका, असे आवाहन केले आहे.
कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते, नजर जाते पासून ते थेट परत आपल्या शरीरात कोरोनाचे विषाणू जातात अशा अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. यामुळे लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. लसीकरण व लोकसंख्या हा अभ्यासाचा विषय आहे. कारण पोलिओचे लसीकरण करतानाही अशाच अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलिओविराेधातील लढा यशस्वी झाला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. प्रदीप शेलार यांनी सांगितले की, देशातील ६० टक्के नागरिक सोशल मीडियाचा वापर करत असून ही संख्या दर मिनिटाला वाढत आहे. फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाचा वापर तरुण पिढीमध्ये वाढत आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणामुळे होणाऱ्या साइड इफेक्टच्या बातम्या या घराघरात वाचल्या जात आहेत. त्यातून अनामिक भीती निर्माण होत असून लसीकरणातील हाच मोठा अडथळा आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून नागरिकांमधील कोरोनाची भीती निघून गेली आहे. ते बिनधास्तपणे वावरत आहेत. कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या गेल्या होत्या व त्यामुळे उपचारासाठी अडथळे निर्माण झाले होते. लसीकरणाबाबतही हेच होत आहे. परंतु केंद्र व महाराष्ट्र सरकारला येत्या काळात नक्कीच यश येईल, कारण चुकीच्या बातम्यांचे आयुष्य फारच छोटे असते व आपण सर्वांनी याचा अनुभव कोरोना संक्रमण काळात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
लस घेताना हे लक्षात ठेवा
- औषध, खाण्याचा पदार्थ किंवा कुठल्या दुसऱ्या कारणाने ॲलर्जी असेल तर तुम्ही कोव्हिशिल्डची लस घेऊ नका.
- ताप आला असेल किंवा थॅलेसिमिया, अन्य कुठला रक्ताचा आजार असेल तर कोरोना लस घेऊ नये.
- महिला गर्भवती आहे किंवा गर्भधारणेचा विचार करत असाल, महिला बाळाला दूध पाजत असेल, तर त्यांनी काेराेनाची लस घेऊ नये.
- कोरोनासाठी तुम्ही यापूर्वीच एखादी लस घेतली असेल तर पुन्हा लस घेऊ नका.
- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ॲलर्जी झाली असेल तर दुसरा डोस घेऊ नका, असे तज्ज्ञांनी सांगितले.