सावधान! कोरोना कमी झाला, पण 'मेंटल ट्रॉमा' वाढला; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:49 PM2024-03-06T15:49:13+5:302024-03-06T16:00:46+5:30
Corona Virus : कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल आणि सर्व काही पूर्वीसारखे होईल, परंतु या महामारीनंतरही, त्यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य सुधारलेले नाही.
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या महामारीने जगातील लाखो लोकांचा मृत्यू झाला. या आजारामुळे भारतासह इतर देशांतील लोकांना अनेक महिने घरातच थांबावं लागलं. मात्र अद्यापही कोरोनाने पाठ सोडलेली नाही. संकट फक्त सध्या थोडं कमी झालं आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाँग कोविडच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला आहे.
Sapien लॅबद्वारे प्रकाशित Tara Thiagarajan आणि Jennifer Newson यांचा 2023 च्या ग्लोबल मेंटल स्टेट रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, लोकांना वाटलं होतं की कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल आणि सर्व काही पूर्वीसारखे होईल, परंतु या महामारीनंतरही लोकांचे मानसिक आरोग्य सुधारलेले नाही.
71 देशांमधील (46,982 भारतातील) चार लाखांहून अधिक लोकांसह केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 30.4 टक्के भारतीय मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत आणि ते खराब मानसिक आरोग्याशी संघर्ष करत आहेत, तर जागतिक स्तरावर ही संख्या 27.1 टक्के आहे. भारताच्या तुलनेत युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये जास्त लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत. याउलट कॅनडा, अमेरिका, सिंगापूर, फ्रान्स, इस्रायल, इटली आणि श्रीलंका येथे लोकांचे मानसिक आरोग्य चांगलं आहे.
प्लास्टिकचा वापर धोकादायक
या रिपोर्टमध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की साथीच्या रोगाने आणलेले अनेक बदल अजूनही सुरू आहेत. कोरोनानंतर प्लास्टिकचा वापर वाढला आहे. Surfrider फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार, प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या Phthalates आणि इतर केमिकल्समुळे माणूस नैराश्य, चिंता, ADD किंवा स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजारांना बळी पडू शकतात.
सर्वाधिक फटका 35 वर्षांच्या लोकांना
तरुण वयात स्मार्टफोन वापरणं आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्याचे या रिपोर्टमध्ये आढळून आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका 35 वर्षांच्या लोकांना बसला आहे. तर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या मानसिक आरोग्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
मानसिक आरोग्याच्या समस्या
भारतात, 18-24 वयोगटातील निम्म्याहून अधिक लोक (50.7 टक्के) मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. तर 25-34 वयोगटातील ही संख्या 42.9 टक्के, 35-44 वयोगटातील लोकांसाठी 28.7 टक्के आणि 45-54 वयोगटातील 17.6 टक्के होती. याशिवाय 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे.
शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांचा खोलवर संबंध असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. शिक्षण जितके जास्त तितका ताण कमी किंवा याच्या उलट देखील असू शकतं. भारतात, प्राथमिक शिक्षण घेतलेले सुमारे 48 टक्के लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत, तर पीएचडी पदवी घेतलेले 14.4 टक्के लोक अशा मानसिक स्थितीत होते.