रावेर तालुक्यातही कोरोनाचा मृत्युदर ३.६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 06:51 PM2021-04-03T18:51:21+5:302021-04-03T18:51:26+5:30
सरासरी ११.३६ ने कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चिंतनीय
रावेर : तालुक्यात १८ फेब्रुवारीपासून सुमारे ५०० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११.३६ टक्के, तर कोरोनामुळे मृत्यमुखी पडण्याचे शेकडा प्रमाण ३.६ टक्के एवढे असून, समाजमनातून कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे.
रावेर तालुक्यात शासनाने दि. १८ फेब्रुवारीपासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर निर्बंध लागू केले असून ४४ दिवसांत सुमारे ५०० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, त्यापैकी केवळ २५० रुग्ण अलगीकरण वा विलगीकरणांतर्गत तूर्तास सक्रिय आहेत. या ४४ दिवसांत सुमारे १८ कोरोनाबाधित रुग्ण मयत झाले आहेत.
रावेर कोविड केअर सेंटरला आजमितीस ५३ रुग्ण, तर रावेर ग्रामीण रुग्णालयातील कोविड ऑक्सिजन सेंटरला ३३ बेडची व्यवस्था असताना ४० रुग्ण औषधोपचार घेत आहेत. कोरोनाची लक्षणे अंगावर काढून प्रकृती गंभीर होऊन अंतिम टप्प्यातील अत्यावस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने मृत्युदर वाढता असून, केवळ सुदृढतेच्या भ्रमात असलेल्या ४५ ते ५९ वर्षे या वयोगटांतील कोरोनामुळे मृत पावणार्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे मत नोडल ऑफिसर डॉ. एन. डी. महाजन तथा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.