अहमदाबाद : गुजरातमधील गांधीनगर भारतीय तंत्रशास्त्र संस्थेच्या (आयआयटी) संशोधकांनी कोरोनाविरोधी लढ्यात योगदान देत छातीच्या ‘एक्स रे’तून कोविड-१९ या रोगांचा संसर्ग झाल्याचे लवकरात लवकर निदान करणारे कृत्रिम बद्धीमत्ता आधारित उपकरण विकसित केले आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे संकेत हे ऑनलाईन उपकरण देत असल्याने वैद्यकीय तपासणीआधी जलदपणे प्राथमिक निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जाऊ शकतो. हे उपकरण दुर्गम भागासाठी उपयुक्त असून वैद्यकीय क्षेत्रावरील अतिरिक्त भार कमी होईल.
गांधीनगर आयआयटीतील संगणकशास्र आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी कुशपाल सिंह यादव (एम. टेक) यांनी सहयोगी प्राध्यापक कृष्ण प्रसाद मियापूरम यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण विकसित केले आहे. कोविड-१९ संसर्ग चाचणीसाठ मर्यादित केंद्र असल्याने आम्हांला एक्स-रेच्या माध्यमातून त्वरित विश्लेषण करणारे कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित उपकरण विकसित करण्याची कल्पना सुचली. उपयुक्त आणि विश्वसनीय उपकरण विकसित करण्यासाठी योग्य पद्धत आणि माहिती जरुरी असते. निदान चाचणीत आमचे उपकरण उपयुक्त ठरेल आणि या निदानासाठी मोठ्या प्रमाणावर वापरही करता येऊ शकतो.ही प्रणाली ‘कोविडएक्सरे डॉट आयआयटीजीएन डॉट एसी डॉट इन’ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणीही जेपीईजी, पीएनजी आदी स्वरुपात छातीचा एक्स-रे किंवा सीटी-स्कॅनची डिजिटल प्रत अपलोड करुन संबंधित व्यक्तीला कोविड-१९ चा संसर्ग झाला की नाही, हे तपासू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणाचा वापर करुन कोणत्याही नवीन व्यक्तीच्या उपरोक्त स्वरुपातील प्रतिमेवरुन कोरोना संसर्ग झाल्याचे निदान केले जाते. विशेष म्हणजे चाचणीचा निष्कर्ष अवघ्या काही सेकंदात मिळतो.