coronavirus: कोरोनाचे संक्रमण हवेतून सर्वदूर नाही, भारतीय संशोधकांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 05:36 AM2020-07-10T05:36:10+5:302020-07-10T05:36:23+5:30
कोरोनाचे विषाणू काही काळासाठी हवेमध्ये तरंगतात़ याचा अर्थ असा नाही ते सर्वत्र हवेद्वारे पसरतील आणि सर्वांना संक्रमित करतील़ त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही़
नवी दिल्ली - नुकतेच एका वैज्ञानिकांच्या गटाने कोरोनाचा संसर्ग हवेद्वारेही शक्य आहे, असे सांगितले होते़ त्याला जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) सहमती दर्शवली होती़ मात्र, भारताच्या काऊन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) मधील संशोधकांच्या मते, ताज्या संशोधनाचा असाही अर्थ होऊ शकतो की, कोरोनाचे विषाणू काही काळासाठी हवेमध्ये तरंगतात़ याचा अर्थ असा नाही ते सर्वत्र हवेद्वारे पसरतील आणि सर्वांना संक्रमित करतील़ त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही़
सीएसआयर-सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले, की हा चांगला अभ्यास आहे़ त्या आधारे डब्ल्यूएचओला सांगितले आहे की, कोरोनाचे विषाणू काही काळासाठीच हवेमध्ये राहू शकतात़ याचा अर्थ असा की, तो पाच मायक्रॉनपेक्षा सूक्ष्म तुषारांत प्रवास करू शकतो म्हणजेच एखाद्या थेंबापेक्षा तो हवेमध्ये जास्त काळ तरंगू शकतो़
मिश्रा यांनी लोकांनी सावधगिरी बाळगणे तसेच गर्दीमध्ये जाऊ नये, असे आवाहन केले आहे़ वैज्ञानिक म्हणाले, की कोणत्याही स्थितीत शारीरिक अंतर ठेवलेच पाहिजे. वातानुकूलित खोलीत (एसी)े हवेचे प्रमाण कमी असते अशा ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येण्याचे टाळले पाहिजे़ कोरोना विषाणूबद्दल फारच कमी माहिती आहे आणि त्याबद्दल पुरेशी माहिती लवकरच सांगण्यात येईल.
डब्ल्यूएचओला ३२ राष्ट्रांतील २३० पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी असे लिहिले आहे की, हा विषाणू असलेले सूक्ष्म कणही हवेतून लोकांना संक्रमित करू शकतात याचा पुरावा आहे, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या अहवालात म्हटले आहे. आरोग्य संघटनेने कोरोना खोकला आणि शिंकण्याद्वारे पसरतो आणि तो हवेतून संक्रमित होणारा नाही, असे वारंवार सांगितले होते.