नवी दिल्ली - कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. वैज्ञानिक कंबर कसून या कामात लागले आहेत. यातच आता भारतातील औषध महानियंत्रकने कोरोना व्हायरस महामारीवरील (Coronavirus Pandemic) संभाव्य उपचार 'अँटीसेरा'च्या मानवी परीक्षणासाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला (ICMR) मंजुरी दिली आहे. ICMRच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अँटीसेरा' (Antisera) घोड्यांना निष्क्रिय Sars-Cov-2 (व्हायरस)चे इंजक्शन देऊन विकसित करण्यात आला आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, 'आयसीएमआरने हैदराबाद येथील फार्मास्युटिकल कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेडच्या साथीने 'अँटीसेरा' विकसित केला आहे. आम्हाला नुकतीच त्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे.'
यापूर्वी आयसीएमआरने आपल्या एका निवेदनात म्हटले होते, 'कोरोनावर मात केलेल्या रुग्णांपासून मिळालेला प्लाझ्मादेखील हा उद्देश पूर्ण करू शकतो. मात्र, अँटीबॉडीची प्रोफाईल आणि त्याचा प्रभाव एका रुग्णातून दुसऱ्या रुग्णात भिन्न आहे. यामुळे हे कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनात अविश्वसनीय ठरते.'
अँटीसेरा म्हणजे का? -अँटीसेरा म्हणजे एक प्रकारचे ब्लड सीरम. यात एखाद्या विशिष्ट प्रकारच्या रोगजंतूशी लढण्याची क्षमता असलेल्या अँटीबॉडीचे प्रमाण अधिक असते. कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढविण्यासाठी हे इंजेक्शनच्या सहाय्याने मानवाला दिले जाते.
या आजारांसाठीही करण्यात आलाय वापर -यापूर्वी, हॉर्स सेराचा वापर अनेक प्रकारचे व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन्स, रेबीज, हॅपेटायटीस बी, वॅक्सीनिया व्हायरस, टेटनस, बोटूलिझ्म आणि डायरियाच्या उपचारांसाठी करण्यात आला आहे.