CoronaVirus News : लस घेण्याआधी किंवा पहिला डोस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली तर? तज्ज्ञ म्हणाले की.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 02:55 PM2021-04-22T14:55:30+5:302021-04-22T15:01:05+5:30
CoronaVirus News : कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर लस घ्यायला न गेल्यास चांगलं ठरेल. कारण तुम्ही लसीकरण केंद्रावर लक्षणांसहित गेल्यास इतरांमध्ये संक्रमण पसरण्याचा धोका वाढू शकतो.
कोरोना व्हायरसच्या लढाईत लसीचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे केला जात आहे. भारतात १ मे पासून १८ वर्षाखालील सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही खूप प्रश्न आहेत. लस घेण्याआधीच कोरोनाची लक्षणं दिसली तर काय करायचं? किंवा लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास काय करायला हवं? अशा शंका लोकांच्या मनात आहेत. हेल्थ एक्सपर्ट्सनी अशाच काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंस सेंटर फॉर हेल्थ सिक्योरिटीमधील संक्रामक रोग तज्ज्ञ डॉक्टर अमेश अदलाज यांनी एबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, ''कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर लस घ्यायला न गेल्यास चांगलं ठरेल. कारण तुम्ही लसीकरण केंद्रावर लक्षणांसहित गेल्यास इतरांमध्ये संक्रमण पसरण्याचा धोका वाढू शकतो.''
सीडिसीनं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोविड १९ रूग्णांनी पूर्णपणे बरं झाल्यानंतरच लस घ्यायला हवी. पूर्णपणे बरं न होताच तुम्ही जर आयसोलेशनमधून बाहेर आला असाल तर लस नक्कीच टोचून घेऊ नका. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तर एखादी व्यक्ती संक्रमित झाली असेल तर अनेक आठवड्यांपर्यंत दूसरा डोस घेऊ नये.
आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी
न्यू इंग्लँज जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन अभ्यासानुसार कोरोनातून बरं झाल्यानंतर जवळपास ३ महिन्यांनंतर लस घ्यायला हवी. तज्ज्ञांच्या मते नैसर्गिक पद्धतीने इंफेक्शनपासून बरं झाल्यानंतर इम्यूनिटी चांगला प्रतिसाद देते. यामुळे शरीरात एंटीबॉडी मजबूत आणि जास्त दिवस राहण्यास मदत होते.
कोणत्या व्हिटॅमिन किंवा सप्लीमेंटने तुमचा कोरोनापासून बचाव होईल? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...
कोरोनातून बरं झाल्यानंतर अनेक आठवडे थांबून लस घ्यायला हवी. लसीकरणाच्या घाईमुळे तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी इतरांना संक्रमित करू शकता, म्हणून घाई करू नका. लक्षणं दिसत असल्यास लसीकरण रद्द करून पूर्ण बरं झाल्यानंतर घ्या.
कधी करावी चाचणी
आयोग्य व्यवस्थेच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची अनेक सामान्य लक्षणे आहेत. त्यामध्ये ताप, अंगदुखी, वास आणि चव जाणे, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय डोळे लाल होणे. जुलाब आणि कानासंबंधीच्या समस्या अशीही लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करावी.
कधी चाचणी करू नये
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर कुठल्याही व्यक्तीला कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक अवधी लोटला असेल. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील. तर रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी करण्याची गरज नसेल.