कोरोनाच्या कहरामुळे संपूर्ण जगभरातील लोकांना मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अखेर या संकटापासून सुटका कधी होणार? लोक पूर्वीप्रमाणे सामान्य जीवन कधीपासून जगू लागणार? असे प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहेत. अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनातून कोरोनाच्या प्रसाराबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसची माहामारीचा संपूर्ण वर्षभर लोकांना सामना करावा लागणार आहे असं दिसत आहे.
सायंटिफिक रिपोर्ट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रकात असे म्हटले आहे की, हिवाळ्यात कोरोनाची अधिक प्रकरणे येतील आणि उन्हाळ्याच्या हंगामात कमी प्रकरणे दिसतील. विषुववृत्ता जवळील देशांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे कमी आढळतील. तर पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण भागात असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूची जास्त प्रकरणं आढळतील. ११७ देशांच्या आकडेवारीच्या आधारे संशोधकांनी हे संशोधन प्रकाशित केले आहे.
या संशोधनादरम्यान, कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमध्ये देशाच्या अक्षांशाचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. हे संशोधन हेडलबर्ग इंस्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ जर्मनी आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी केले आहे. यात असे आढळले आहे की जेव्हा पृथ्वीच्या भूमध्य रेषेपासून एक अक्षांश रेषा वाढते तेव्हा दर १० लाख लोकसंख्येमागे कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये ४.३ टक्के वाढ होते.
संशोधकांनी असे म्हटले आहे की जे लोक भू-मध्यरेषेच्या जवळ आहेत. तिथे १० लाखांच्या लोकसंख्येमागे ३३ टक्के कोरोनाची प्रकरणं कमी आहेत. सूर्याची अतिनील प्रकाश किरणं कोरोना विषाणू कमकुवत किंवा नष्ट करू शकतो. याचा अर्थ असा आहे की जगात उन्हाळ्याच्या काळात कोरोना विषाणूची संख्या कमी असेल. तथापि याचा अर्थ उन्हाळ्याच्या काळात कोरोना विषाणूचा साथीचा रोग संपणार असा होत नाही. परंतु त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते.
दरम्यान कोरोनाची बाधा झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत तीन हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ झाली आहे. सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांची टक्केवारी १७.१३ टक्के आहे, तर देश पातळीवर कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ८१.७७ टक्क्यांवर आली आहे. एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर खाली येऊन १.१० टक्क्यांवर आला आहे. एक कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतात गेल्या वर्षी सात ऑगस्ट रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली होती. ३० लाख २३ ऑगस्ट, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख आणि १६ सप्टेंबर रोजी ५० लाखांच्या पुढे गेली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख आणि १९ डिसेंबर रोजी कोटीच्या पुढे गेली होती.