Coronavirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रोबोट धावून येणार, रोबोट संसर्गापासून वाचवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:29 PM2020-03-31T12:29:17+5:302020-03-31T12:30:53+5:30
कोरोनाग्रस्तांचे उपचार करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकिय स्टाफ यांचा जीव धोक्यात असण्याची शक्यता आहे.
सध्या जगभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर उपाय योजना केल्या जात आहेत. अशा परिस्थिती सोशल डिस्टंसिंग खूप महत्वाचं आहे. अशात कोरोनाग्रस्तांचे उपचार करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकिय स्टाफ यांचा जीवधोक्यात असण्याची शक्यता आहे. अशात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासठी रोबोट मदत करत आहे.
एखाद्या माणसाप्रमाणे हॉस्पीटलला विषाणूमुक्त करण्यापासून रुग्णांना जेवण आणि औषधं पोहोचवण्याचं काम रोबोट करतो. कोविड-१९ पासून सुटका मिळवण्यासाठी भारतात सुद्धा रोबोटची मदत घेतली जाणार आहे. रोबोटच्या वापरामुळे वैद्यकिय क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला रुग्णाजवळ जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मदत मिळेल. डब्ल्यूएचओ ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीत चीनच्या वुहान शहरातील होंगशान स्पोर्ट्स सेंटरमध्ये फिल्ड हॉस्पिटलमध्ये १४ रोबोट तैनात करण्यात आले आहेत.
बीजिंगमधील रोबोट कंपनी क्लाऊटमाईंड्स द्वारे उपलब्ध करण्यात आलेले रोबोट साफ-सफाई तसंच कोरोना व्हायरसपासून मुक्त करण्याच्या प्रक्रियेत मदत करतील. भारतातील जयपूरमधील सवाई मानसिंह या सरकारी दवाखान्यात मानवाप्रमाणे दिसत असलेल्या रोबोटवर परिक्षण करण्यात येत आहे. या रोबोद्वारे कोविड-१९ ने पिडित असलेल्या व्यक्तीला जेवण देण्यापासून,औषधं देण्यापर्यंत मदत पूरवली जाईल.