ऑक्टोबर महिना जगभरामध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. याचा मुख्य हेतू म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचं वाढत्या आजाराचे प्रमाण रोखणं हाच आहे. भारतामध्ये या आजाराबाबत योग्य तेवढी जागरूकता आढळून येत नाही. परंतु हा आजार हळूहळू आपले हातपाय पसरू लागला आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या अनेक कर्करोगांपैकी स्तनाचा कर्करोग हा जास्त आक्रमक कर्करोग आहे. या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या महिलांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्या महिलांमध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 प्रकारचा स्तनाचा कर्करोग आढळतो. तो सहज ठिक होण्यासारखा असतो. जाणून घेऊया स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करण्याचे फायदे...
नियमितपणे तपासणी करणं -
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं आढळून आल्यास महिलांनी दरवर्षी स्क्रीनिंग, मेम्ब्रेन यांसारख्या तपासण्या करणं गरजेचं असतं. त्यामुळे आजाराची लक्षणं आणि गंभीरता जाणून घेण्यास मदत होते.
पौष्टिक आहार -
महिलांनी आपल्या आहाराबाबत जागरूक असणं गरजेचं असतं. त्यामुळे शक्य तेवढं जंक फूडचं सेवन करणं टाळावं. याव्यतिरिक्त आपल्या आहारात सोयाबिन, दूध, दही यांसारखा प्रोटीनयुक्त आहार त्याचप्रमाणे दलिया, डाळी, फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी -
वजन नियंत्रित असेल तर तुमचं अनेक आजारांपासून रक्षण होते. त्यामधील एक आजार म्हणजे स्तनाचा कर्करोग. त्यामुळे यापासून आपला बचाव करण्यासाठी महिलांनी वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं.
स्तनपान करणं फायेदशीर -
काही महिला स्तनपान करताना फार घाबरतात. वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे, स्तनपान करणं हे महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. स्तनपान करणाऱ्या महिलांना कर्करोग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
व्यायाम करा -
ज्या महिला आठवड्यातून 5 दिवस कमीतकमी 30 ते 40 मिनटं व्यायाम करतात. त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.