ओमकार गावंड
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देशातील नागरिकांना आरोग्य व्यवस्थेबद्दलचे महत्त्व कळले. या कठीण काळात सर्वात महत्त्वाची भूमिका ही डॉक्टरांनी पार पडली. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये अनेक डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. तरीही डॉक्टर एखाद्या योद्ध्याप्रमाणे कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सामील झाले आहेत. डॉक्टर या पेशाबद्दल स्वत: डॉक्टरांना काय वाटत आहे, तसेच या कठीण काळात ते कशा प्रकारे कामगिरी बजावत आहेत? याबद्दल विविध शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलेल्या भावना...डॉक्टरांना आपल्या समाजात देवदूत समजले जाते आणि आज त्याची खरेच प्रचिती येत आहे. आज एक जबाबदार नागरिक आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय सेवक म्हणून देशाप्रति आमचे एक कर्तव्य आहे. आज सारा समाज हा आशेच्या नजरेने डॉक्टरांना देवाच्या रूपात पाहत आहे. त्या सर्वांना या संकटातून बाहेर काढून स्वत:ची काळजी घेत राष्ट्र जगविणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आम्ही चोख पार पाडत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. या तणावाच्या परिस्थितीत डॉक्टरसुद्धा मानसिक तसेच शारीरिक तणावाचे बळी होत आहेत. नागरिकांनी त्यांची काळजी घेत घरीच थांबायला हवे. - डॉ. राहुल वाघ, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र
एखादा रुग्ण जेव्हा बरा होऊन जातो तेव्हा जग जिंकल्याचा आनंद होतो. डॉक्टर बनून आपण एखाद्याला जीवदान देतो यापेक्षा सुखावणारी गोष्ट जगात कुठलीच नाही. कोरोना आल्यापासून आम्ही सर्व डॉक्टर भरपूर कष्ट करून रुग्णसेवा करत आहोत. पीपीई किट हा शब्द कधी ऐकलाही नव्हता, परंतु आता तेच किट घालून काम करावे लागत आहे. सरकारकडूनही आम्हाला खूप मदत व चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक डॉक्टर कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रेसर होतो आणि पुढेही राहणार. - डॉ. शारिवा रणदिवे,जनरल सेक्रेटरी, सेंट्रल मार्डमागच्या काही वर्षांत डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता समाजात डॉक्टरांविषयी आदराची भावना राहिलेली नाही, असा समज निर्माण झाला होता. या हल्ल्यांमुळे अनेक डॉक्टरांनी डॉक्टरी पेशालाच रामराम ठोकला. अनेकांचा कल हा रेडिओलॉजी व डरमॅटोलॉजीकडे जाऊ लागला. मागील चार महिने कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व डॉक्टर जोमाने काम करत आहोत. या काळात सोशल मीडियामार्फत लोकोपयोगी माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात समाजाच्या सर्व स्तरांतून डॉक्टरांना भरपूर आदर मिळाला. त्यामुळे समाजाचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ही भावना मनात निर्माण झाली. - डॉ. दीपक मुंढे, अध्यक्ष, के.ई.एम. मार्ड