एनर्जी ड्रिंकपासून खरंच एनर्जी मिळते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:54 PM2017-11-22T17:54:10+5:302017-11-22T17:54:56+5:30
तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते किंवा लागू शकतं हृदयाचं दुखणं!
- मयूर पठाडे
एनर्जी ड्रिंक तुम्ही घेता? अधूनमधून तरी नक्कीच घेत असाल. त्यानं कसं मस्त फ्रेश वाटतं. डोक्याला कशी एकदम तरतरीच येते. हो ना? त्यात तुम्ही जर अॅथलिट असाल, व्यायामपटू असाल, वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेत असाल, रनिंग, सायकलिंग, स्वीमिंग.. अशा वेळी तर ही एनर्जी ड्रिंक तुमच्यासाठी मोठा सहाराच असतात. आपला झालेला एनर्जी लॉस झटपट भरून काढण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करीत असाल. तुमचे प्रशिक्षकही बºयाचदा तुम्हाला ही अशी एनर्जी ड्रिंक्स घेण्यासाठी सजेस्ट करीत असाल.. हे घेण्यानं तुम्हाला नक्कीच मस्त वाटत असेल, पण ही एनर्जी ड्रिंक्स घेण्यापूर्वी किमान दहा वेळा विचार करा..
ही एनर्जी ड्रिंक्स सातत्यानं घेण्यानं तुमच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि तुमचं ब्लड प्रेशरही वाढू शकतं. त्यामुळे जे कोणी एनर्जी ड्रिंक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतील, त्यांनी सावधान! त्यांनी तातडीनं आपली ही सवय आटोक्यात आणावी, शक्य झालं तर लवकरात लवकर सोडावी आणि एनर्जी लॉस भरून काढायचाच असेल तर त्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.
अॅथलिट्सना या एनर्जी ड्रिंकचा सर्वात जास्त तोटा सहन करावा लागतो. कारण झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तेच जास्त प्रमाणात या ड्रिंक्सचा वापर करतात.
यासंदर्भातलं संशोधन नुकतंच ‘फ्रंटियर्स’ या जगप्रसिद्ध आरोग्य मासिकात प्रसिद्ध झालं आहे.
यापेक्षाही आणखी एक धोकादायक बाब संशोधकांच्या निदर्शनास आली आहे ती म्हणजे काही जण एनर्जी अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून ते पितात. असं करणं तर अत्यंत धोकादायक आहे आणि त्यापासून सगळ्यांनी लांब राहावं असा कळकळीचा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.