लंडन : ए, बी, एबी, ओ हे रक्तगट नेहमीच ऐकायला येतात; पण त्याहूनही वेगळे रक्तगट आहेत. ब्रिटनमधील ब्रिस्ट्रल विद्यापीठ व नॅशनल हेल्थ सर्व्हे ब्लड अँड ट्रान्सप्लांट (एनएचएसबीटी) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक नवा व खूपच दुर्मीळ असा रक्तगट शोधून काढला आहे. त्याला ईआर असे नाव देण्यात आले आहे. ज्या महिलांचा ईआर हा रक्तगट असतो, त्यांच्या प्रसूतीच्या वेळी पोटातील बाळाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते, असेही यासंदर्भातील संशोधनात आढळून आले आहे.
कोणत्याही रक्तगटाची ओळख रक्तातील प्रोटिनमुळे होते. ही प्रोटिन लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागांवर आढळून येतात. एखाद्याच्या रक्तात आरएच प्रोटीन असेल तर त्याचा रक्तगट पॉझिटिव्ह होतो, अन्यथा हा रक्तगट निगेटिव्ह होतो. दोन गर्भवती महिलांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने पोटातच त्यांच्या बाळांचा मृत्यू झाला होता. या दोन महिलांचा रक्तगट ईआर होता हे तपासणीत आढळून आले. (वृत्तसंस्था)
यामुळे होऊ शकतो बाळाचा मृत्यूज्या गर्भवती महिलेचा रक्तगट ईआर असेल तर तिची प्रतिकारशक्ती पोटातील बाळाच्या रक्तगटाविरोधात अँटीबॉडीज तयार करते. या अँटीबॉडीज प्लेसेंटाच्या माध्यमातून पोटातील बाळापर्यंत पोहोचतात. आईच्या अँटीबॉडीज या बाळाच्या लाल पेशींवर हल्ला चढवितात. त्यामुळे बाळाला गंभीर आजार होऊ शकतात व प्रसंगी त्याचा मृत्यू येऊ शकतो.