Health: आला पावसाळा, पोट सांभाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:29 PM2022-06-19T12:29:34+5:302022-06-19T12:30:21+5:30
Health Tips For Rainy Season: पावसाळा हा कितीही आल्हादायक वाटत असला तरी याच काळात नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असते. पावसाळी आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांचा समावेश असला तरी विशेष करून पावसाळ्यात पोटविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
- डॉ. अमित मायदेव
(पोटविकार तज्ज्ञ, संचालक, बलदोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई)
पावसाळा हा कितीही आल्हादायक वाटत असला तरी याच काळात नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असते. पावसाळी आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांचा समावेश असला तरी विशेष करून पावसाळ्यात पोटविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पोटविकारात प्रामुख्याने मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, आतड्याला सूज येणे, अपचन, वाढते पित्त या आजारांचा सामना रुग्णांना करावा लागतो. हा आजार होण्याचे कारण म्हणजे खाद्य पदार्थ आणि पाण्यातून झालेला संसर्ग. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
रस्त्यांवर मिळणारे चाट आणि ज्यूस यामध्ये ज्या पाण्याचा वापर होतो, त्यात सूक्ष्म जंतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून मोठ्या प्रमाणात पोटाचे विकार निर्माण होतात. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे या काळात टाळावे. या दमट वातावरणात शरीरातील पचनसंस्थेची कार्यक्षमता मंदावते. यामुळे गॅस्ट्रोइंट्रायटिस होण्याची शक्यता असून पोटात सतत जळजळ होते. कारण यामध्ये पचन संस्थेवर जीवाणूंचा विपरीत परिणाम होतो. पावसाळ्यात गॅस्ट्रोच्या साथीचे प्रमाण अधिक असते.
- पाणी उकळून व गाळून प्यावे. पुरेसे पाणी प्यावे.
-जेवण योग्य पद्धतीने शिजवून आणि चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे.
- दररोज संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायाम, कसरती, योग केला पाहिजे, त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
-कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. कारण तणावाचा थेट परिणाम शरीरातील पचनसंस्थेवर होत असतो.
- वॉशरूममधून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. रस्त्यावरील कापलेली फळे खाणे शक्यतो टाळा. घरामध्ये जेवढी स्वच्छता राखता होईल, तितकी राखण्याचा प्रयत्न करा.
- घरात हवा खेळती ठेवून कोंदट वातावरणात अधिक
काळ राहू नका.
- पोटविकाराची कोणतीही समस्या असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.
- स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका.