- स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनानंतर मानसिक आरोग्याचे महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले. मानसिक स्वास्थ्याचे हेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यात आता ई-मानस प्रणालीचा आरंभ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पहिले केंद्र आज, सोमवारी ठाणे येथील मानसोपचार रुग्णालयात सुरु केले जाणार आहे. शिवाय, भविष्यात अन्य जिल्ह्यांत या सेवेचा विस्तार करून एका कॉलवर मानसिक आरोग्यविषयक समस्येविषयी मदत मिळणे सोपे होणार आहे.
ई-मानस प्रणाली अंतर्गत प्रथमच राज्यातील मानसिक सेवा देणाऱ्या संस्था, तज्ज्ञ यांच्यासह उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑनलाइन नोंद केली जाणार आहे. या प्रणालीत मानसिक आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांसह सर्व रुग्णांची नोंद ठेवणे बंधनकारक असेल. कर्नाटक सरकारने यासाठी सुरू केलेली ई-मानस प्रणाली खरेदी केली आहे. ही प्रणाली बंगळुरूच्या आयआयटी आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या निमहान्स संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. याच प्रणालीत काही बदल करून राज्यात वापरण्यात येणार आहे.
प्रणालीचे महत्त्व ई मानस प्रणालीमध्ये राज्यात मानसिक आरोग्य सेवा देणारी सरकारी तसेच खासगी रुग्णालये, दवाखाने इत्यादी आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक असेल. यामध्ये मनोरुग्णांच्या पुनर्वसन केंद्राचीही नोंदणी केली जाईल. मनोरुग्णांच्या संपूर्ण तपशीलासह कोणते उपचार दिले जात आहेत. याची माहितीही आस्थापनांना यात अद्ययावत करणे बंधनकारक असेल. रुग्णांची संपूर्ण माहिती यामध्ये असल्यामुळे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास यामुळे मदत होईल. राज्याने मानसिक आरोग्य सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरात आठ मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळे सॉफ्टवेअरलाही जोडली जाणार आहेत.
टेलिकन्सल्टेशन ठरेल वरदानसरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, संस्थामधील मानसिक आरोग्याशी निगडीत तज्ज्ञ, रुग्ण यांचा अद्ययावत तपशील या प्रणालीद्वारे संकलित करण्यात येणार आहे. ई मानस प्रणालीचे काम करणारे पहिले केंद्र ठाण्यात कार्यरत होणार आहे. त्यानंतर या प्रणालीचा विस्तार पुणे, बीड, नागपूर येथे केला जाईल. नागपूर येथील एम्समध्ये असणारे केंद्र सर्व प्रणालीच्या मेन्टॉरिंगचे काम पाहणार आहे. प्रत्येक केंद्रात आठ समुपदेशक असतील. शिवाय, मानसोपचारतज्ज्ञ, व अन्य वैद्यकीय अधिकारी मिळून २० जणांची टीम असेल. टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळणे सोपे ठरणार आहे. - डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग